वाडा : राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल भुसारा यांचा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी अपमान केल्याचा आरोप भुसारा यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने वाडा शहरातील बस स्थानकासमोर जिल्हाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा आदिवासी उपाययोजना सन २०२३-२४ राज्य स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार भुसारा यांनी आपले मत मांडले असता जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आमदार भुसारा यांचा एकेरी नामोल्लेख करत त्यांच्याशी गैरवर्तन केले.
आमदार भुसारा हे लोकप्रतिनिधी, आदिवासी आमदार आहेत. त्यांचा जिल्हाधिकारी यांनी अवमान केला असल्याचा आरोप भुसारा यांनी केला आहे. याचा विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी (०७) वाडा बस स्थानक येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला.