स्वत:ची डॉक्टर होणारी मुलगी गावातीलच मुलासोबत प्रेम प्रकरणात असल्याचे समजल्यावर वडील व भावांनी भावी डॉक्टर मुलीला एका रात्रीत संपवून टाकले. खताच्या पोत्यात तिला टाकून शेतातील एका जागेवर तिचे सरण तयार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तिची राख उधळण्यात आली. तोपर्यंत गावातील कोणालाच तिच्या खुनाची कल्पना नव्हती. या एका घटनेने संपूर्ण मराठवाडा हळहळला आहे. केवळ ही एक घटनाच नव्हे, तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एका ज्येष्ठ ८० वर्षीय महिलेला रात्री बेदम मारहाण करून तिचा जीव जाईपर्यंत तिच्या घरात फिल्मी स्टाईल थरार केला. अन्य एका घटनेत पती नांदवायला सोबत नेत नाही म्हणून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारली. त्यामध्ये दोन चिमुकल्या मुलांचा जीव गेला. या सर्व घटना वेगवेगळ्या; परंतु अलीकडच्या पंधरा दिवसांतीलच असल्याने मराठवाड्यात ‘जीव सोपा झालाय’! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी महिपाल या गावात राहणारी शुभांगी जोगदंड ही २३ वर्षीय मुलगी बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. शुभांगीचे गावातीलच एका तरुणांसोबत प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांना ते प्रेमसंबंध मान्य नव्हते. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरे एक स्थळ पाहून तिचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आठच दिवसांत हे लग्न मोडायला भाग पाडले. त्यामुळे गावात बदनामी झाली. त्यानंतर तिचे कुटुंबीय नाराज होते. रागाच्या भरातच त्या मुलीचा वडिलांनी गळा दाबून खून केला. या प्रकरणात मुलीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जनार्दन जोगदंड, काका गिरधारी शेषराव जोगदंड व चुलत भाऊ गोविंद शेषराव जोगदंड आणि मामा केशव पिराजी कदम या पाच जणांना अटक केली आहे. या पाच जणांनी मिळून शुभांगीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जाऊन पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मराठवाड्यात एकच खळबळ उडाली. शुभांगी ही तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचे मित्र व मैत्रिणी तिचा शोध घेऊ लागले. घरच्या मंडळींनी देखील तिची मृत्यूची वार्ता बाहेर येऊ दिली नव्हती. नांदेडमध्ये झालेला हा ऑनर किलिंगचा प्रकार सर्वांना हळहळ करायला लावणारा आहे.
तेलंगणा व मराठवाडा या दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या देगलूर येथील ८० वर्षीय वृद्ध महिला चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील ही २३ जानेवारी रोजी आपले पती श्रीपतराव रामजी पाटील यांच्यासोबत घरी असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वीस ते तीस वर्षं वयोगटातील तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी ९० वर्षीय श्रीपतराव पाटील यांचे पाय कपड्याने बांधले व त्यांची पत्नी चंद्रकलाबाई हिचे पाय व तोंडावर कपड्याने बांधून तिचा खून केला. खून केल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या अंगावरील मनी मंगळसूत्र, सोन्याची बोरमाळ, हातातील सोन्याच्या पाटल्या, तसेच कपाटातील सोन्याचे कडे व चांदीचे वाळे असे अंदाजे चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. एका वृद्ध महिलेचे हातपाय बांधून तिचा खून करून तिच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने चोरून नेण्याची घटना नांदेड जिल्ह्यात खळबळ उडविणारी ठरली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. या घटनेत मयत वृद्ध महिला चंद्रकलाबाई हिचा भाचा शहाजी मरतळे याने अन्य तीन आरोपींना हा कट रचवून दिला. या वृद्ध दांपत्यांच्या घराची रेकी करून आरोपींनी हा गुन्हा केला. या घटनेत नांदेड व लातूर जिल्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुंती तांडा या गावातील संतोष राठोड व पूजा आडे या दोघांच्या भांडणात दोन बालकांना निष्पाप जीव गमवावा लागला. या दोघांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर या दांपत्याला एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य झाले. पती संतोष आडे हा कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होता. त्याची पत्नी पूजा हीने ‘मलादेखील तुझ्यासोबत पुणे येथे स्थायिक कर’ असा तगादा लावला होता. त्यावरून या दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला. दोघांच्या वडिलांचे याच कारणावरून चांगलेच भांडण झाले. त्यामुळे धास्तावलेल्या पूजाने स्वतःचा अडीच वर्षांचा मुलगा सिद्धार्थ व तीन महिन्यांची मुलगी फुदी हिला घेऊन विहिरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला; परंतु या प्रकरणात तिची दोन्ही मुले वाचू शकली नाहीत; परंतु पूजा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. पती नांदवायला सोबत नेत नाही हा राग मनात धरून तिने जे काही कृत्य केले ते समाजाला काळिमा फासणारेच आहे. या घटनेनंतर ‘माता ना तू वैरिणी’ असेच म्हणण्याची वेळ पूजावर आली.
या सर्व घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातील या घटना असल्यामुळे पोलिसांचा ग्रामीण भागात वचक कमी झालेला आहे, हेच यामधून लक्षात येते. समाजात वावरत असताना पोलिसांची भीती समाज घटकावर असणे आवश्यक आहे. पोलिसांची भीती, दबदबा, वचक कायम असेल तर कोणीही कुठलेही कृत्य करण्यापूर्वी शंभर वेळेस विचार करतो; परंतु अलीकडच्या काळात मराठवाड्यातच नव्हे तर सर्वच ठिकाणी पोलिसांचा वचक कमी झालेला पाहावयास मिळत आहे. विशेषतः ग्रामीण भागात तर पूर्वी पोलीस म्हटले की, सर्वजण दबकून राहत असे; परंतु हल्ली पोलिसांची भीती कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही अनेक घटना घडत आहेत. असे प्रकार पुन्हा वारंवार घडू नयेत यासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे. पोलिसांनीच पोलिसांची भीती समाजात राहावी या दृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यांना देखील वरिष्ठ पातळीवर प्रशासनाकडून किंबहुना राज्य शासनाकडून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.
–अभयकुमार दांडगे