०३ ते १२ मार्च दरम्यान धावणार एसटीच्या जादा गाड्या
मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त यावर्षी २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या ०३ मार्च ते १२ मार्च दरम्यान कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. यावेळी, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.