
मुंबई: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम फेब्रुवारी २०२४ पूर्वी पूर्ण केले जाईल, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या महामार्गाच्या रुंदीकरण आणि सुधारणा कामाच्या अनुपालन अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पहिल्या ४२ किमी लांबीच्या दुरुस्तीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत आणि ४२ ते ८४ किमी लांबीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल असे म्हटले आहे. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारने पनवेल ते इंदापूर हा पट्टा सोडून उर्वरित पट्ट्यातील महामार्ग रुंदीकरणाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. त्याआधीही अनेकवेळा राज्य सरकारने महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या तारखा वारंवार बदलल्या होत्या आणि त्यासाठी न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकार व प्राधिकरणाच्या कामावर समाधान दर्शवत अनुपालन अहवालावर याचिकाकर्ते ओवेस पेचकर यांचे मत विचारले. त्यावर पेचकर यांनी महामार्गाचे बरेच काम पूर्ण केल्याचे मान्य केले. मात्र, सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.