Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाठाण्यातील जलतरणपटूंची शहिदांना अनोखी मानवंदना

ठाण्यातील जलतरणपटूंची शहिदांना अनोखी मानवंदना

‘धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया’ अंतर पोहून केले पार

ठाणे (वार्ताहर) : ठाण्यातील साधारणत: ८ ते १७ वयोगटातील १८ जलतरणपटूंनी भल्या पहाटे ४ वाजता धरमतरच्या जेटीवरून पाण्यात झोकून देत तब्बल ९ तासांनी गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहिदांना आणि ठाणेकरांसाठी पितृतुल्य असणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांना आगळीवेगळी मानवंदना दिली.

ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलावात सर्वश्री अर्णव पाटील, अमीर साळसकर, जयराज नाखवा, वंशिका आयर, रोहन राणे, अथर्व पवार, सोहम देशपांडे, करण नाईक, मित गुप्ते, मनोमय लिंगायत, अमोल दिवाडकर, स्वरा हंजनकर, रुद्र शिलारी, अपूर्व पवार, गौरी नाखवा, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, श्रीकर पेडणेकर आदी युवा होतकरू जलतरणपटू नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा कसून सराव करतात. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी ३३ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते. प्रत्येकी नऊ जणांचे असे दोन गट तयार करण्यात आले होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी पोहायला सुरुवात केली. प्रत्येकी एक किलोमीटर अंतरानंतर आपल्या पुढच्या सहकाऱ्याला टाळी देत दुपारी १ वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांना स्पर्श करत मोहीम फत्ते केली.
प्रशिक्षक नरेंद्र पवार म्हणाले की, खुल्या पाण्यातील विशेषतः सागरी जलतरणाच्या स्पर्धा वाढल्या आहेत. त्यामुळे सागरी जलतरणात मुलांना करियर घडवण्याची संधी मिळाली आहे. सागरी जलतरणात मानसिक आणि शारीरिक क्षमतेचीही कसोटी लागते. त्यातून आव्हानाला सामोरे जाण्याची सवय मुलांना व्हावी याकरता ही मोहीम आखण्यात आली होती. अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आरती प्रधान यांनी या मोहिमेचे प्रोजेक्ट इंचार्ज म्हणून काम पाहिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -