Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होणार...

मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होणार...

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) चे पहिले दोन टप्पे डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ०६० कोटी खर्चून पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. रस्ता तयार झाल्यावर, मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवासाचा वेळ २० मिनिटांपर्यंत कमी होईल असा अंदाज आहे.


सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड यांसारख्या इतर प्रमुख मार्गांवर गर्दी कमी करण्यासाठी गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) ते मुलुंड येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणारा लिंक रोड महत्त्वाचा ठरेल. हा प्रकल्प चार टप्प्यात विभागला गेला असून त्याची किंमत सुमारे ८ हजार कोटी आहे. संपूर्ण प्रकल्प २०२८ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
फेज-१ अंतर्गत, महानगपालिकेने नाहूर रोड ओव्हर ब्रिजचे ७० टक्के काम पूर्ण केले. हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मुलुंड पश्चिम आणि गोरेगाव पूर्व येथील जीएमएलआर रुंदीकरणाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. “दुसऱ्या टप्प्याचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल”, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. बीएमसीने चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) यासाठी ४४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


नागरी संस्थेने कामाचा तिसरा टप्पा नुकताच सुरू केला आहे ज्यात गुरु गोविंद सिंग रोड आणि GMLR जंक्शन येथे उन्नत रोटरी बांधणे, गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथे उड्डाणपूल आणि मुलुंड पश्चिम येथील हेडगेवार जंक्शन येथे उड्डाणपूल यांचा समावेश आहे. जानेवारी २०२५ पर्यंत प्रकल्पाचे ७ टक्के काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.



बोगदे २०२८ पर्यंत पूर्ण होतील


बॉक्स बोगदा आणि जुळ्या बोगद्यांचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. चौथ्या टप्प्यात मुलुंड पूर्व येथे ऐरोली जंक्शन येथे उड्डाणपूल आणि गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ओलांडून एक अंडरपास बांधणे यांचा समावेश आहे. बोगद्याचे काम सुरू झाल्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. कंत्राट दिल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Comments
Add Comment