Monday, May 19, 2025

महाराष्ट्ररत्नागिरी

खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट, तीन पुलांची कामे...

खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट, तीन पुलांची कामे...

खेड(वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या जोड पुलाचे काम पूर्ण झाले असून, मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. भरणे येथील उड्डाण पूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभीळ येथील उड्डाणपुलाची कामे पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यांत महामार्गावरील खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.


खेड तालुक्याच्या हद्दीतील जगबुडी नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्च २०१३ मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला भीषण अपघात झाला होता. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस मध्यरात्री नदीपात्रात कोसळली होती. या अपघातात ३७ जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती.
जगबुडीवरील दुसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे, त्यामुळे जगबुडी पुलावरील आधी किंवा आता असलेला अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे कामही पूर्ण झाले असून आता दोन्ही बाजूच्या अप्रोच रोडचे काम सुरू आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाले की या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असे बांधकाम विभागाचे अभियंता माडकर यांनी सांगितले. भरणे नाका येथील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात असून, मार्चअखेर हे काम पूर्ण होणार आहे. त्याशिवाय दाभीळ येथील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, मार्च-एप्रिल दरम्यान पूर्ण होऊन या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे़.

Comments
Add Comment