Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलश्रावणी आणि फुलपाखरे...

श्रावणी आणि फुलपाखरे…

श्रावणी आपल्या आई-बाबांसोबत बागेत फिरायला गेली होती. आई-बाबा बाकड्यावर बसले होते. श्रावणीचे बागेत हुंदडणे सुरू होते. हिरव्यागार मऊ लुसलुशीत गवतावर उड्या मार, धावता धावता मुद्दाम खाली पडून लोळण घे, गवतावरून हळुवारपणे हात फिरव, त्याचा स्पर्श अनुभव, असे तिचे मस्त खेळ सुरू होते. समोरच फुलझाडांची रांग होती. त्यावर रंगीबेरंगी फुले फुलली होती. तिकडे लक्ष जाताच श्रावणी तडक उठली अन् समोरच्या फुलझाडांकडे धावली.

श्रावणी फुलझाडे बघू लागली. लाल, पिवळी, जांभळी फुले पाहून तिला खूप आनंद झाला. तितक्यात तिथे अतिशय सुंदर रंग असलेली फुलपाखरे आली अन् श्रावणीच्या समोरच्याच फुलावर बसली. श्रावणी त्यांना निरखून बघू लागली. त्यांना हात लावण्याचा मोह श्रावणीला झाला. तोच एक फुलपाखरू बोलू लागले, “बाळ, आम्हाला हात लावू नकोस बरे?” तिला कळेनाच कोण बोलतंय. क्षणभर ती थोडीशी घाबरली, अन् आवाजाच्या दिशेने बघू लागली.

फुलपाखरू बोलू लागले, “अगं घाबरू नकोस श्रावणी. मघाशी तुझी आई हाक मारत होती ना तेव्हाच तुझं नाव ऐकलं मी. आम्ही दोघे मुद्दामच तुला भेटायला आलो आहोत. तू ज्या प्रकारे बागेत खेळतेस, मजा करतेस ते पाहून आम्हालाही आनंद झाला. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलंय की, आज दिवसभर तुझ्यासोबतच राहणार. आपण खूप मजा करूया!”
फुलपाखरांचे बोलणे सुरू असतानाच आईची हाक आली. “चल श्रावणी शाळेला उशीर होईल.” मग ती धावतच निघाली आईसोबत अन् काय आश्चर्य ती दोन फुलपाखरेदेखील निघाली श्रावणीसोबत! कधी पुढे तर कधी मागे. कधी श्रावणीच्या डोक्यावर, तर कधी खांद्यावर बसत. ते पाहून आई-बाबांना विशेष वाटले. ते श्रावणीला म्हणाले, “अगं ती फुलपाखरे बघ कशी तुझ्या डोक्यावर बसतात.”
श्रावणी म्हणाली, “हो बाबा ते मित्र आहेत माझे.”
सारे भरभर आटोपून श्रावणी शाळेत निघाली. आताही ती फुलपाखरे तिच्या सोबतच होती. आई म्हणाली, “अगं श्रावणी ही फुलपाखरे शाळेत आली, तर किती गोंधळ उडेल बघ. दे त्यांना हाकलून.”
श्रावणी म्हणाली, “नाही ते माझे मित्र आहेत. ते माझ्यासोबतच राहणार.”
मग श्रावणी आईला टाटा करून निघाली शाळेला. तेव्हा दोन्ही फुलपाखरे तिच्या डोक्यावर जाऊन बसली. रस्त्याने येणारे-जाणारे लोक श्रावणीकडे कुतूहलाने पाहू लागले, हसून आनंद घेऊ लागले. हे बघून श्रावणीलाही खूप आनंद झाला. कधी एकदा शाळेत जाते असे श्रावणीला झाले होते. श्रावणी शाळेच्या आवारात शिरताच तिला तिच्या मैत्रिणी दिसल्या अन् त्या ओरडतच श्रावणीला म्हणाल्या, “अगं तुझ्या डोक्यावर बघ दोन फुलपाखरे बसलीत. हाकलून दे त्यांना.” तोच श्रावणी म्हणाली, “नाही नाही… ते माझे मित्र आहेत. आज ते दिवसभर माझ्यासोबत राहणार आहेत.”
वर्ग सुरू झाला. पण कुणाचेच लक्ष शिकवण्याकडे नव्हते. कारण होते श्रावणीच्या डोक्यावर बसलेली ती फुलपाखरे! मधेच ती उडायची, श्रावणी भोवती घिरट्या घालायची. उडताना त्यांचे रंगीबेरंगी पंख खूप छान वाटायचे. सारी मुले एकटक फुलपाखरांकडेच बघत होती. ही गोष्ट सरांच्या लगेच लक्षात आली.

सर म्हणाले, “काय रे मुलांनो, तुमचे लक्ष नाही शिकवण्याकडे!” तेव्हा साऱ्यांच्या नजरा श्रावणीकडे वळल्या. सर श्रावणीच्या जवळ आले. तेव्हा त्यांना दोन फुलपाखरे श्रावणीच्या डोक्यावर बसलेली दिसली. ती कधी खांद्यावर, तर कधी पुस्तकावर बसत होती. हे पाहून सरांनादेखील खूप आश्चर्य वाटले. त्यांनी उत्सुकतेने विचारले, “श्रावणी कुठून आणलीस ही फुलपाखरे!”

तितक्यात एक फुलपाखरू चक्क बोलू लागलं. “श्रावणी ही एक चांगली मुलगी आहे. ती निसर्गावर प्रेम करते. बागेत गेल्यावर तिथल्या झाडाझुडपांशी, पशू-पक्ष्यांशी प्रेमाने बोलते. उगाच कुणाला त्रास देत नाही. म्हणून आम्ही तिच्यावर खूश आहोत. तिला आनंद मिळावा म्हणून आम्ही दिवसभर तिच्यासोबत राहाणार आहोत. निसर्गावर, आम्हा साऱ्यांवर प्रेम करणारं आणखी जर कुणी भेटलं, तर त्यांनादेखील आम्ही असाच आनंद देऊ.”
फुलपाखरांचं बोलणं संपताच सरांनी जोरात टाळ्या वाजवून श्रावणीचे अभिनंदन केले आणि “आजचा दिवस मजेमजेचा फुलपाखरांसोबत खेळण्याचा” असे म्हणत शिकवणे बंद केले!

-रमेश तांबे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -