Tuesday, January 21, 2025
Homeमनोरंजन‘आलंय माझ्या राशीला’मध्ये वडील-मुलाची जोडी एकत्र

‘आलंय माझ्या राशीला’मध्ये वडील-मुलाची जोडी एकत्र

वडील-मुलाचं नातं थोडं फार व्यक्त. पण बरंचसं अव्यक्त! हा अव्यक्त अतूट हळवा बंध असतो, जो मुलाला आयुष्याच्या प्रवासात निरंतर साथ करतो… कधी संस्कारांच्या, तर कधी खंबीर आधारवडाच्या रूपात. आपल्या मुलाला प्रणवला अशीच साथ देत वास्तूतज्ज्ञ आनंद पिंपळकर ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटातून बारा राशींच्या अनोख्या गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून हे दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. ‘आलंय माझ्या राशीला’ हा सुप्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर निर्मित मराठी चित्रपट १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित आणि फिल्मास्त्र स्टुडिओ प्रस्तुत ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. नुकताच कलाकारांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

याबद्दल बोलताना आनंद पिंपळकर सांगतात की, ‘आजवर मी वास्तूविशारद व ज्योतिषी म्हणून असंख्य जणांना मार्गदर्शन केलं. पण चित्रपटाच्या माध्यमातून राशींच्या गमतीजमती प्रेक्षकांसमोर अधिक चांगल्या रीतीने दाखवता येतील, या उद्देशाने मी या चित्रपटाची निर्मिती केली असून एका विशेष भूमिकेमध्ये मी यात दिसणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असून त्यांच्या सोबतीला माझ्या मुलाचं प्रणवचं अभिनयाचं स्वप्न या चित्रपटाने साकारलं आहे. वैमानिक असलेल्या प्रणवला अभिनयाची आवड आहे. ही आवड पूर्ण करण्यासाठी त्याने ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे. अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून आपलं मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण करताना दिसून येईल. हा चित्रपट प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करेलच, पण प्रत्येकाला राशींबद्दल असलेलं कुतूहलही हा चित्रपट सहजरीत्या उलगडेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.

दैनंदिन जीवनात बहुतांश व्यक्तींना ज्योतिष आणि भविष्याबद्दल उत्सुकता असते. ज्योतिषविषयक हेच ज्ञान त्या व्यक्तीला हसत खेळत ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाच्या माध्यमातून मिळेल. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत.
‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत. गीते गुरू ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे, तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांचे आहे. वेशभूषा मैत्रीयी शेखर आणि संगीता तिवारी यांची आहे. ध्वनी अशोक झुरुंगे तर नृत्यदिग्दर्शन सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रीतम पाटील यांचे आहे. साहसदृश्ये अकबर शरीफ, तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी सांभाळली आहे. १० फेब्रुवारीला ‘आलंय माझ्या राशीला’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -