Categories: कोलाज

सीतेचे अश्रू

Share

माळरानावर फुललेल्या वनस्पतीमध्ये अंगठ्याएवढ्या फुलांची मुळी उगवलेली असायची. या गडद जांभळ्या मुळीमध्ये पाणीदारपणा ठसठशीत भरलेला असायचा. ही वनस्पती पावसात भरभरून बहरायची ती फक्त माळरानावरच. इथे अनेक प्रकारच्या वनस्पती उगवायच्या. फुलांनी अवघं माळरान फुलून जायचं. पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या फुलांची चादरच जणू अंथरल्यागत वाटायची. या फुलांमध्ये या मुळी आपलं अस्तित्व टिकवून राहायच्या त्या अगदी कायम. या मुळींना सीतेची टीपं असे म्हटले जायचे. टीपं म्हणजे अश्रू. हे सीतेचे अश्रू रोज शाळेत जाताना नित्याने दृष्टीस पडायचे. कधी नाइलाजास्तव त्यावरून चालताना अंतःकरण जड व्हायचे. माळरानावरून चालताना ही सीतेची टीपं म्हणजे अगदी जीव की प्राण वाटायचे.

सीतामाईला रावणाने लंकेत नेताना तिचे अश्रू जमिनीवर ओघळले आणि त्याचीच ही वनस्पती म्हणजे सीतेची टीपं अर्थात सीतेचे अश्रू असे बरेचदा ऐकिवात आलेले. काही गोष्टी समजुतीने जरी गोष्टीच्या रूपात ऐकिवात आल्या तरी विचार करायला भाग पाडतात हे नक्की! मुळीतील पाणीदारपणाने ते स्पष्टही व्हायचे. खरंच हे असे असेल का? असा प्रश्नही बरेचदा पडलेला. पावसातील ही मुळी ठरावीक पट्ट्यातच फुलून यायची. येण्या-जाण्याच्या मार्गात असलेली ही वनस्पती कायम नजरेस पडायची. हातात घेतली की अश्रूचा पाणीदारपणा जाणवायचा. सीतामाईवर ओढवलेल्या प्रसंगाची आठवण करून देणारे हे सीतेचे अश्रू आजही आपल्या अस्तित्वाची खूण दर्शवतात याचे आश्चर्य वाटायचे. रानमाळावर ओघळलेल्या अश्रूंची झालेली ही फुले जेव्हा पावसानंतर सुकून जायची तेव्हा मात्र त्या मुळींचे रूपांतर काट्यात व्हायचे. ते माळरान पूर्ण गवताळ व्हायचे. ती फुलांची चादर पावसानंतर विरून जायची आणि पुन्हा कातळ दिसू लागायचं, पण या मुळीचं अस्तित्व मात्र कधीच मिटायचं नाही. चालताना जर या सुकलेल्या मुळीवर पाय पडला, तर काटेरी मुळी पटकन पायात रुतायची आणि टचकन आपल्या डोळ्यांत पाणी यायचे. मग त्या रस्त्याने जावेसे वाटायचे नाही. इतका दाह त्या मुळीत समरसलेला असायचा. त्या मुळीला सीतेचे अश्रू संबोधण्यामागे कारण काय ते नंतर लक्षात आले. डोळ्यांतून जरी अश्रू सुकून गेले तरी त्याच्या वेदना मात्र कायम राहतात, याचे उदाहरण त्या सुकलेल्या फुलांच्या मुळीवरून जाणवलेले अनेकदा. सीतेचे अश्रू ओघळताना पाहिले नसले तरी तिच्या वेदना मात्र समस्त स्त्री वेदनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्याच भासवून जातात. स्त्रीयांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा त्यांच्या मनावर होणारा आघात आणि ओघळणारे अश्रू जरी दिसत नसले तरी त्यांना होणाऱ्या वेदना या कधीही न मिटणाऱ्याच.

अनेक वेदनांचे प्रतिबिंब घेऊन उमलणारी ती फुलांची मुळी सीतेच्या अश्रूंची आठवण करून देणारी असली तरी या अश्रूंमागे अनेक वेदनांचा ठाव घ्यायलाही तितकीच भाग पाडणारी. तिच्या नशिबी आलेला वनवास, व्यथित केलेले जीवन, रावणाने वेश बदलून उगवलेला सूड, राम-रावण युद्ध आणि त्यानंतर पुन्हा सीतामाईच्या नशिबी आलेला वनवास, अग्निपरीक्षेचे दिव्य आदी घटना पाहता तिच्या वेदनांचा ठाव घेता येतो.

माळरानावर उगवणारी फुलांची मुळी ही समजुतीतून आलेल्या कथेचे रूपक असले तरी नकळतच जशी सीतामाईच्या अश्रूंच्या वेदनांचाही ठाव घेणारी ठरते. तशी समाजात एक नवा आदर्श घालून देणारीही ठरते. स्त्रीचा अनादर नको, मुलीचा अपमान नको, पत्नीवर संशय नको. स्त्री वेदनांची ओळख घडविणारी ही फुलांची मुळी माळरानावर आजही फुलत असेल. आपल्या अस्तित्वाची प्रचिती आजही देत असेल. मात्र समाजात घडणाऱ्या घटना पाहता आज ते केवळ सीतेचे अश्रू म्हणून भास देत नाहीत, तर समस्त स्त्री वेदनांनाही नकळतच गवसणी घालतात एवढे मात्र नक्की!

-प्रियानी पाटील

priyani.patil@prahaar.co.in

Recent Posts

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

36 minutes ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

1 hour ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

7 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

8 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

8 hours ago