
मराठीत जेवढे प्रयोग झाले असतील, तेवढे अन्य कोणत्याही भारतीय भाषात झाले नसावेत. मग ते काव्य असो, नाट्य असो सिनेमा असो की साहित्य असो. अनेकदा मराठीतून प्रेरणा घेऊन इतर भारतीय भाषात लिखाण झालेले आहे. एक अपवाद म्हणजे फार तर बंगाली साहित्य आणि गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य. बाकी माझी मराठी महानच!
कविवर्य शंकर वैद्य यांची एक कविता अशाच बाबतीत लक्षणीय ठरते. अरुण दाते यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचे! त्यांनी अरुण दातेंच्या आवाजात या गाण्याचा आशय अगदी यथार्थपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. कारण ही कविता, हे भावगीत काही एक सर्वसाधारण कविता नाही. तो एक मोठा गूढ असा आध्यात्मिक अनुभव आहे. कविवर्य शंकर वैद्य यांनी तो शब्दांत कैद करण्याचे जवळजवळ अशक्य काम लीलया करून दाखवले.
या नितांत सुंदर गाण्याचे शब्द होते - आज हृदय मम विशाल झाले, त्यास पाहुनी गगन लाजले...
पहिल्याच दोन ओळीत लक्षात येते की, ही कविता, हे गीत काही सोपे नाही. ते समजावून घ्यावे लागेल. चक्क आकाश एका माणसाच्या हृदयाचे विशालपण पाहून लाजेल? इतके विशाल हृदय? कसे शक्य आहे? मुळात माणूस माणूस तो काय? त्याचे एका मुठीच्या आकाराचे हृदय ते केवढे? आणि त्याला पाहून आकाशाने लाजायचे? म्हणजे हा तर ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी’सारखी उपमा झाली. छे! अशक्य! ज्यांना महाराष्ट्र ‘माऊली’ म्हणून ओळखतो त्या ज्ञानेश्वरांचे ठीक आहे. पण शंकर वैद्य? आणि इथेच तर गंमत आहे. वैद्यांनीसुद्धा फार वेगळा, फार उदात्त अनुभव इथे शब्दांत मांडला आहे.
संत तुकारामांचे अभंग हे उत्तम उपमा अलंकार यांनी सजलेले अक्षर साहित्य म्हणून आजही अभ्यासले जाते. महाराजांनी जमेल तितके सोपे लिहिण्याचा प्रयत्न केला हेही सत्यच! मात्र त्यांची एक रचना या पार्श्वभूमीवर उठून दिसते. “अणूरणीया थोकडा, तुका अकशाएवढा!” हा अभंग केवळ काव्यरचना नाही तो एक अतिंद्रिय अनुभव आहे. काहीसा तसाच प्रकार शंकर वैद्य यांनी आपल्या अतिसंक्षिप्त कवितेत मांडलेला दिसतो. ते म्हणतात माझी जाणीव, माझी चेतना इतकी अवाढव्य झाली की ती आकाशात मावेना! माझ्यातून निघणारे किरण माझे हात झाले आणि मी अवघी पृथ्वी ओंजळीत घेतली! अवकाशात तळपणारा सूर्य मला माझ्या कपाळावरचे गंधच वाटू लागला! केवढी जबरदस्त कल्पना! ‘पॅराडाइज लॉस्ट’या खंडकाव्यात जॉन मिल्टनने वापरली होती तशी अतिभव्य शैली!शंकर वैद्यांच्या गीताची पुढची ओळ, तर अलीकडे पाश्चिमात्य देशात अतिशय लोकप्रिय झाल्याने चर्चेत असलेल्या एन.डी.ई. म्हणजे निअर डेथ एक्स्पिरियन्स या अनुभवाइतकी चित्रमय आहे
त्या विश्वाच्या कणाकणांतून, भरून राहिले अवघे मी पण...
एन.डी.ए.बद्दल सांगायचे, तर सिंगापूरमधील अनिवासी भारतीय असलेल्या अनिता मुराजानी यांचे त्या विषयावरचे अनेक व्हीडिओ आज यूट्यूबवर आहेत. त्यांना कर्करोग झाला होता आणि त्या इस्पितळात अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत होत्या. शरीराच्या सगळ्या संस्था-रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पंचनसंस्था बंद पडू लागल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाइकांना ‘रुग्ण आता केवळ काही तासांचा सोबती आहे.’ त्यामुळे जवळच्या सर्वांना शेवटच्या भेटीसाठी बोलावून घ्यायलाही सांगितले होते. अनिता मुरजानी यांचा भाऊ भारतात होता. आपल्या बहिणीच्या जीवनाचे केवळ काहीच तास शिल्लक आहेत, असा निरोप मिळाल्याने तो प्रचंड चिंतेत पडला. अत्यंत विमनस्क मन:स्थितीत विमानतळावर काहीही करून सिंगापूरच्या विमानाचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होता. आणि क्षणार्धात ते घडले! अनिताबाई या जगातून गेल्या. त्यांची जाणीव, शरीरातून बाहेर पडली. त्यांना स्वत:चे लोळागोळा होऊन दवाखांच्या कॉटवर पडलेले शरीर दिसत होते. इतकेच नाही, तर ‘त्या कोमात आहेत’, असे वाटत असताना डॉक्टर तळमजल्यावर त्यांच्या पतींशी जे बोलत होते, ते शब्द त्यांना स्पष्ट ऐकू येऊ लागले. दूर भारतात असलेल्या भावाच्या मनातील विचारही कळू लागले. त्यांनी म्हटले आहे की, भावाचे मन, जवळच्या इतर अनेकांचे मन आणि माझे मन एकच झाले होते. मला त्याक्षणी सगळ्यांच्याच मनातले विचार कळत होते...
मृत्यूनंतर मनाचे एकदम असे वैश्विक प्रसरण होते, ही काही कविकल्पना नाही. ते एक सत्य आहे हीच गोष्ट अनेक आध्यात्मिक व्यक्तींच्या पुस्तकात, व्हीडिओत अनेकदा आलेली आहे. शंकर वैद्यांच्या बाबतीत नेमके काय होते ते जरी आपल्याला माहीत नसले तरी या कवितेतून प्रकट होणारा अनुभव हुबेहूब तसाच आहे. आपल्या कवितेत ते पुढे म्हणतात - आज माझिया किरणकरांनी ओंजळीमध्ये धरली अवनी अरुणाचे मी गंध लाविले... ते पुढे म्हणतात - त्या विश्वाच्या कणाकणांतून भरून राहिले अवघे ‘मी’पण फुलता फुलता बीज हरपले...
माझी केवळ माझ्या स्थूल शरीरात बंदिस्त असलेली जाणीव मुक्त झाली आणि विश्वाच्या कणाकणात गेली. जणू अंकुरित होताना, फुलताना, झाडाचे मूळ बीज नष्ट व्हावे, भोवतालच्या अस्तित्वात विलीन व्हावे, विरून जावे आणि त्याचा वृक्ष व्हावा तितका सहज नैसर्गिक अनुभव! संत तुकारामांचा अभंगही हेच सांगतो. महाराज म्हणतात, अणूहून लहान असलेले माझे अस्तित्व आकाशाएवढे विशाल असल्याची जाणीव मला झाली. शरीराच्या मर्यादांचा आणि मूळ चैतन्याच्या विश्वव्यापीपणाचा अनुभव आला. त्यामुळे मी बाहेर पडून आत्मसाक्षात्कार अनुभवला! दृश्य जगाच्या भ्रमातून मी बाहेर पडलो! आता आतला अंधार पूर्णत: संपला आहे.
अणुरेणियां थोकडा, तुका आकाशाएवढा... गिळुन सांडिले कलेवर, भव भ्रमाचा आकार... सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता...
एक संत आणि एका आधुनिक कवीच्या लेखनात जे साम्य आढळले, ते नोंदवावेसे वाटले म्हणून हा नॉस्टॅल्जिक प्रपंच!
-श्रीनिवास बेलसरे
Shashank Madhav Joshi August 18, 2025 01:44 AM
Shriniwasji Namaskar ... farach sunder rasagrahan!.. whenever i feel sad, I remember the view seen from aero plane window .. the clouds floating below, mountains rivers lakes oceans cities tiny cars ships moving around ... the hugeness of everything entering inside and reflected on minds eye .. the insignificant me encompassing the universe ... and my tensions and problems disappear ...I am an armature singer and before trying out this song googled its title .. many thanks for your writing and warm regards .. cheerio !