Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीएबी फॉर्म चुकीचे दिल्याचा सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट

एबी फॉर्म चुकीचे दिल्याचा सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट

काँग्रेसमधील गोंधळ चव्हाट्यावर!

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. मात्र ते एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट आज सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी आज त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, गेले महिनाभर सुरू असणारे राजकारण सर्वांनी पाहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक आणि प्रसारमाध्यमे मला प्रश्न विचारत आहेत. त्याची उत्तरे मी आज देत आहे. आमच्या परिवाराने किती आणि काय काम केले ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मी गेली अनेक वर्षे पक्षात निष्ठेने काम केले. मी पक्षात अनेक उपक्रम राबवले. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केले. त्याचे कौतुकही झाले. परंतू तरीही आमच्या विरोधात राजकारण खेळण्यात आले.

सत्यजित तांबे लढतील की सुधीर तांबे हे पक्षात ठरलेले नव्हते. त्यानंतर मला ९ जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असे पदेशाध्यक्षांनी सांगितले. तर ११ तारखेला बंद लिफाप्यात एबी फॉर्म मिळाले. परंतू ते एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजित तांबे यांनी यावेळी केला. तसेच हे फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचे कळवले नसते, असे सत्यजित तांबे म्हणाले.

त्यानंतर १२ तारखेला दुपारी साडेबारा वाजता एबी फॉर्म पाठवण्यात आले. परंतू त्या फॉर्ममध्ये उमेदवार म्हणून माझ्या वडिलांचे नाव होते. माझे वडीलांनी अनेकदा मला इच्छा नाही, माझा मुलगा निवडणूक लढणार असल्याचे श्रेष्ठींना स्पष्ट सांगितले होते. एबी फॉर्म वर दुसरे नावाच्या ठिकाणी चक्क निल असे म्हटलेले होते. तरीही मी काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच फॉर्म भरला. परंतू एबी फॉर्म नसल्याने माझा अर्ज अपक्ष म्हणून निवडणूक अधिका-यांनी ग्राह्य धरला. ही बाब मीडियासह कोणीही निदर्शनास आणली नाही किंवा याची कोणीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -