
मुंबई: गोवा पर्यटन विभागाने एका खाजगी कंपनीसोबत भागीदारी करुन पर्यटकांना खुशखबर दिली आहे. आज गोव्यात हेलिकॉप्टर पर्यटन सेवा झाली असून या सेवेसाठी दौजी-एला आणि ओल्ड गोवा येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत हेलिपॅड बांधण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यातील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी गोवा सरकार नेहमीच नवनवीन मार्ग शोधत असते. पर्यटन सेवा उत्तम प्रकारे पुरवण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी हाच चांगला पर्याय असून आज सुरु करण्यात आलेली हेलिकॉप्टर सेवा हे याचे उत्तम उदाहरण आहे.
यावेळी गोवा पर्यटन विभागाने यावेळी कॉल सेंटर सुविधेचाही आरंभ केला. हेलिकॉप्टर पर्यटन सेवेत एक्झिक्युटिव्ह चार्टर्स, आंतरराज्यतील प्रवास, विमानतळ प्रवास आणि मागणीनुसार पर्यटन सेवा पुरवण्यात येणार आहे. या सेवेच्या दरांबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.