वासुदेव आला हो वासुदेव आला….
काही दिवसांपूर्वी एकदा खेळण्यांच्या दुकानात गेले असता तेथील नाना प्रकारची खेळणी, शोभेच्या बाहुल्या, छोट्या मोठ्या वाहनांच्या प्रतिकृती, काही अभ्यासू खेळ, काही मनोरंजनाचे तर काही डोक्याला-विचारांना चालना देणारे नवनवीन आकर्षक खेळ पाहण्यात मी मग्न झाले होते. एवढ्यात अचानक एका चिमुरडीच्या रडण्याच्या आवाजाने माझी एकाग्रता भंग पावली. ती लहान मुलगी आईचा हात ओढत तिच्या चिमुकल्या डोळ्यांतून भली-मोठी आसवं गाळत म्हणत होती,
‘आई मला हाच सांताक्लॉज हवाय, बघ ना किती क्यूट दिसतोय तो आणि स्वीट गातोय!’ मी त्या रडणाऱ्या मुलीकडे आणि तिला समजावणाऱ्या आईकडे बघत राहिले. मग माझं लक्ष गेलं ते लांबसडक पांढऱ्या शुभ्र दाढीवाल्या ढगळ लाल सदरा घातलेल्या सांताबाबाकडे! आणि त्याच्याकडे पाहता पाहता मला माझ्या लहानपणीचा तो दिवस आठवला, जेव्हा मोठी साद घालत असाच एक बाबा दारोदारी टाळ आणि चिपळ्या वाजवत, नाचत, गाणी म्हणत भल्या पहाटे आम्हाला झोपेतून उठवायला दारी येई. आधी वाटायचं, आईने आम्हाला सकाळी लवकर उठवण्यासाठी हे कुठलं तरी गाणं लावलंय की काय? पण दररोज येणारा तो मधुर आवाज हळूहळू आम्हाला आवडायला लागला. आमच्या परिचयाचा झाला, तर आमच्या या बाबाचं नाव होतं वासुदेव! आई त्याला कधी घरातील धान्य, कधी पैसे देत असे व तो समाधानाने आशीर्वाद
देऊन गात गात पुढे मार्गस्थ होत असे.
दान पावलं, बाबा दान पावलं
वासुदेव आला, हो वासुदेव आला
सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला ।।
हे बोल गात गात वासुदेव नित्यनेमाने सूर्य उगवल्याप्रमाणे रोज अवतरत असे. वासुदेवाची हाळी ऐकून आम्ही भावंडं अंथरुणातून पटकन उठून तयारी करून बसत असू आणि जसजसा त्याचा आवाज जवळ येई तसंतसं आतुरतेने त्याच्या प्रतीक्षेत दारात उभे राहत असू. आईलाही बरं वाटे की, कधीही लवकर न उठणारी ही मुलं वासुदेवाच्या दर्शनासाठी, त्याचा आवाज ऐकण्यासाठी लवकर उठू लागली आहेत आणि शहाण्यासारखी वागू लागली आहेत. सांताबाबासारखीच आमच्या या वासुदेवाकडेही एक जादूची झोळी असायची. त्यात तो नाना तऱ्हेचे पदार्थ, वस्तू, पैसे असं काहीबाही ठेवत असे. वाटायचे की, ही झोळी आहे की जादूची गुहा? जी कधी संपतच नाही. त्या झोळीला अनेक कप्पे असायचे आणि त्यात सगळं काही सामावून जायचं. वासुदेवाने गायलेले अभंग, कवनं, ओव्या, गाणी तेव्हा आम्हालाही पाठ होऊन गेली होती. त्याचा आवाज असा काही टिपेला लागे की, ऐकताना समोरच्याचं चित्त हरवून जाई. आई म्हणायची की, त्याला दान दिलं की ते पावतं. त्याचा आशीर्वाद सगळ्यांना लाभतो. असा हा वासुदेव आम्हाला विलक्षण बुद्धिमानही वाटे. कारण त्याला सगळी गाणी अभिनयासहित तोंडपाठ असत. शिवाय तो अखंड बोलत असे.
खरं तर वासुदेव ही महाराष्ट्रातील एक प्राचीन परंपरा. वारकरी पंथातील कृष्णवंशातील कृष्णाचे भक्त म्हणून घेणारी जमात म्हणजे वासुदेव. कलेला सोबत घेऊन लोकांना संगीतातून जागृत करण्याचं कार्य हा वासुदेव करत असे. कृष्णाची प्रतीकं म्हणून कपाळावर गंध, मोरपिसाचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार किंवा धोतर, खांद्यावर उपरणं, गळ्यात झोळी, कमरेला छोटी बासरी अशा रूपात हा वासुदेव गावागावांत भिक्षा मागत फिरायचा.
हा वासुदेव एकाच वेळी एका हाताने टाळ दुसऱ्या हाताने चिपळी, साथीला पायातील घुंगरांचा लयबद्ध नाद करत उपदेशात्मक अभंग बोधात्मक कवनं यांची वैविध्यपूर्ण रचना करून समाजाला प्रबोधन करीत असे. हे समाज कल्याणाचं कार्य तो फार पूर्वीपासून करत आलाय. अगदी शिवरायांच्या काळातही या बहुरूप्या वासुदेवाने हेरगिरीचं काम करून स्वराज्याच्या कार्यास हातभार लावल्याचे दाखलेही इतिहासात सापडतात.
वासुदेव भल्या पहाटे हरिनामाचा जयघोष करत गावाला जागवतो. लहान-थोरांना गोष्टी सांगून त्यांचं मनोरंजन तर करतोच. पण समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद त्याच्या गाण्यात, आवाजात आणि एकूणच त्याच्या दर्शनात असते. त्याचा मधुर आवाज, चेहऱ्यावरील निरागस भाव आणि गाण्यातून व्यक्त होणारी आपुलकी, प्रेम देत तो सर्वांना आपलंस करून टाकी. भक्तिभावातून जनसामान्यांचं मनोबल वाढवत समाज प्रबोधनाचं महान कार्य तो अविरत करत असे.
पण कालांतराने गावांना शहराचं रूप मिळालं अन् माणसं यंत्रवत जगू लागली. जागोजागी मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट उभी राहू लागली. त्यामुळे वासुदेवाला सहजतेने शिरकाव करणं आणि लोकांना भेटणं मग अशक्य होऊ लागलं. गल्ली-रस्त्यातून हाळी देत जाणारा वासुदेव आजही कधीतरी दुरून दिसतो. कोणी बोलावलं, तर येतो. नाहीतर नाइलाजाने आल्यापावली निघूनही जातो. पण एकूण त्याचं गाणं आणि दर्शन आता हळूहळू कमी कमीच होत चाललेलं आहे.
आजच्या टच स्क्रीनच्या जमान्यात कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना सकाळी जागवणाऱ्या वासुदेवापेक्षा रात्री उशिरा येणारा सांताक्लॉज अधिक जवळचा वाटू लागला आहे. सांताक्लॉज म्हणे मुलांना गिफ्ट देतो. म्हणून ती त्याची वाट पाहतात. पण आपल्या मराठी मातीतल्या, आपल्या लोकपरंपरेचा वारसा पुढे चालवणाऱ्या साध्या भोळ्या वासुदेवाचा मात्र आज सर्वांनाच विसर पडत चालला आहे. नव्या पिढीला वासुदेवाचं आकर्षण वाटत नाही. अनेकांना त्याच्याबद्दल माहितीही नाही. अजूनही ग्रामीण भागात वासुदेव बरेचदा येतो. पण त्याची हाक सर्वांपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचली तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही.
त्याच्याकडून मिळालेला उपदेश, त्याच्या आवाजातील गाणी, त्याची अलौकिक वेशभूषा आणि त्याची पिढीजात कला हा आपल्या संस्कृतीचा गौरव बिंदू आहे. मात्र दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड आता तो झाकून गेलाय. आजही काही वासुदेव घराण्याचा वारसा म्हणून चिकाटीने ही कला जपताना दिसतात, पण त्यांना शासनाकडून किंवा समाजाकडून थोडंफार साहाय्य आणि प्रोत्साहन मिळालं, तर ही लोकपरंपरा जिवंत राहील आणि खऱ्या अर्थाने ‘दान पावलं’ असं खुद्द या वासुदेवाबद्दल आपल्याला म्हणता येईल.
-रूपाली हिर्लेकर
[email protected]