
मुंबई: सायंकाळ ७.३० ते ८ ची वेळ, स्थळ दादर स्टेशन. तिकिट काऊंटरच्या समोरील जागेवर सहा मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या. त्रस्त, चिंतीत आणि भयभीत! या मुली स्टेशनबाहेर तिकिट घरासमोर अशा जमिनीवर का बसल्या आहेत? असा प्रश्न तेथील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडला होता. कुणीतरी तो प्रश्न त्यांना विचारलाच अन् समोर आलं भयानक वास्तव.
नाशिक जिल्ह्यातून मुंबईला पोलीस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या या सामान्य शेतकऱ्यांच्या मुली. नायगांव येथेच ही पोलिस भरती प्रक्रिया सुरू होती. तेथेच त्यांची राहण्याची व्यवस्थाही होती पण ही जागा ऐनवेळी नाकारण्यात आली. जागा भरलेली असल्याने तेथून त्यांना परत जाण्यास सांगितले पण कुठे राहायचे याचा काही पत्ता दिला नाही. या बिचाऱ्या सहा मुली तेथे बराच वेळ वाट बघत तशाच बसलेल्या. त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता आता रात्र काढायची कुठे?
सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येते. गेस्ट रुममध्ये गेल्यानंतर ५ हजार रुपये भाडं या मुली कुठुन देणार? मग या मुली परत आल्या आणि पुन्हा दादर स्थानकातील तिकिटगृहाच्या बाहेर बसल्या. याबाबच एका पोलिस कॉन्स्टेबलकडे या मुलींच्या राहण्याची सोय होऊ शकते का अशी विचारणा केली. त्याने प्लॅटफॉर्मवर असलेल्या विश्रामगृहाचा रस्ताही दाखवला पण येथे २ तासांच्या वर राहता येणार नाही, असे तो म्हणाला.
रात्रीची मुंबई म्हणजे गर्दुल्ले, पाकीटमार यांची. या स्थानकाबाहेर तर या गर्दुल्ल्यांचा राबता असतो. तो पोलीस कॉनस्टेबल म्हणाला, मी आहे तोवर येथे बसा पण रात्रीचे इन्चार्ज आले तर ते तुम्हाला बसू देणार नाहीत. फक्त सामानाची काळजी तेवढी घ्या.
गावातील कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आणि मुली पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहनत घेऊन मुंबईत येतात. मुलांप्रमाणेच या मुलीही त्यांच्या कुटुंबीयांचा आधार असतात. पोलिस सेवेत भरती होऊन इतरांना सुरक्षा देण्यासाठी आलेल्या या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? पोलीस भरतीसाठी आदल्या दिवशी जागरण करुन दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता ग्राऊंडवर धावायचं. शारीरीक क्षमतेची चाचणी द्यायची. हे सर्व शक्य नेमकं करायचं तरी कसं? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आज या सहा मुलींचा प्रश्न समोर आला आहे. आणखी कित्येक जणींना या प्रकाराला सामोरे जावे लागले असेल याची गणती नाही.