Saturday, October 18, 2025
Happy Diwali

अमरावती पदवीधर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत धीरज लिंगाडे विजयी

अमरावती पदवीधर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत धीरज लिंगाडे विजयी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला.

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत लिंगाडे यांना आघाडी मिळाली. त्यांनी निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला नाही. पण मते अधिक असल्याने लिंगाडे विजयी झाले. निवडणूकअधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली. धीरज लिंगाडे पाटील यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली. तर रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे यांनी अखेर बाजी मारली.

त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील चार जागांचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले. कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे येथून विजयी झाले. त्यांना वीस हजार ७४८ मते मिळाली. त्यांच्याविरुद्ध उभे असलेले महाविकास आघाडीकडून शेकापचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना ९ हजार ३८ मते मिळाली. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने थेट उमेदवार न उतरवता महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केला होता. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले. त्यांना १४०६९ मते मिळाली. गाणार यांना ६३६६ मते मिळाली. येथील ९० टक्के मते जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर अडबाले यांच्याकडे गेली. याच मुद्द्यावर अनेक शिक्षक संघटनांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे पुन्हा एकदा निवडून आले. त्यांनी भाजपाचे किरण पाटील यांचा पराभव केला. त्यांना वीस हजार ९१ मते मिळाली तर किरण पाटील यांच्याकडे १३४९७ मते होती. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा