महिलांच्या क्रिकेटसाठी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या मैदानात महिलांसाठी टी-२० क्रिकेट मॅचचे आयोजन आजपासून करण्यात आले आहे. पहिल्या सामन्याच्या उद्घाटनासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
मिरा भाईंदर शहरात क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आर. बी. के. शाळेलगत असलेल्या महापालिकेच्या मैदानात प्रथमच महिलांसाठी क्रिकेटचे आयोजन करण्यात आले असल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमी व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
आताच्या काळात भारताच्या महिला क्रिकेटने बरेच यश संपादन केले आहे. भविष्यात मिरा भाईंदर शहरातून उत्कृष्ठ महिला क्रिकेटपटू घडवण्यासाठी विविध क्रिकेट अकॅडमी या सातत्याने प्रयत्न करत राहतील, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
ज्याप्रमाणे पुरुष क्रिकेट वर्गासाठी महापालिका प्रशासन विविध प्रयत्न करते त्याचबरोबर महिलांच्या क्रिकेटसाठीसुद्धा प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आयुक्त ढोले यांनी दिले आहे. याप्रसंगी महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे प्रतिनिधी पी. वी. शेट्टी, बेटी बचाओ-बेटी पढाओ संस्थेचे चेअरमन अजय दुबे, मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमीचे प्रतिनिधी व महिला खेळाडू उपस्थित होते. याठिकाणी सामने पहाण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली आहे.