Friday, June 20, 2025

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६८३ मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. त्यांना १०९९७ मते मिळाली.


या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.


विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. ३० जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते.


सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण ९९ मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण २८ टेबल ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण ३५ हजार ०६९ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ३३ हजार ४५० मते वैध ठरली तर १६१९ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी १६७२६ इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता.



उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे


➡️ ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे - 20683
➡️ धनाजी नानासाहेब पाटील - 1490
➡️ उस्मान इब्राहिम रोहेकर - 75
➡️ तुषार वसंतराव भालेराव - 90
➡️ रमेश नामदेव देवरुखकर - 36
➡️ बाळाराम दत्तात्रेय पाटील - 10997
➡️ राजेश संभाजी सोनवणे - 63
➡️ संतोष मोतीराम डामसे - 16


दरम्यान, माझा विजय हा सर्व शिक्षकांचा आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवला. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवणार असल्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले. विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि या सर्व प्रचार यंत्रणेचे नेतृत्व करणारे आमदार नितेश राणे यांचेही आभार म्हात्रे यांनी मानले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >