मुंबई: प्रतिष्ठेच्या झालेल्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असताना सध्या आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी महाविकासा आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनीच त्यांचा प्रचार केला नाही अशी चर्चा आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचा पुत्र सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला अधिकृत उमेदवार घोषित केले. पण असे असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होतो आहे. यावर बोलताना स्वतः शुभांगी पाटील यांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगितली आहे.
त्या म्हणाल्या “मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यासाठी प्रचार केला नाही याविषयी मला तरी माहिती नाही. जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर किंवा नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहचण्याआधी महाविकासआघाडीचे नेतेमंडळी हजर होते. मला रस्त्यावर घेण्यासाठीही तेच होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही, असा कोणताही विषय नाही”, असे शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत.