Tuesday, February 11, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणात विकास गंगा वाहू द्या...!

कोकणात विकास गंगा वाहू द्या…!

महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे महाआघाडी सरकार जाऊन भाजप-बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता आली. कोकणवासीय नेहमीच आशा अपेक्षा ठेवून असतो. मागील अडीच वर्षांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. साहजिकच कोकणच्या जनतेने कोकणातून मोठ्या संख्येने आमदार निवडून दिले होते. यामुळे साहजिकच कोकणवासीय अपेक्षा ठेवून होते. कोकणासाठी काही भरीव आर्थिक तरतूद होईल, विकासप्रक्रिया वेगवान होईल; परंतु असेल काहीच घडले नाही. उलट नेहमीप्रमाणे कोकणाला गृहीत धरण्यात आले. विकास निधी नाहीच. चांदा ते बांदा योजना गुंडळण्यात आली. सिंधुरत्न विकास योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पहिल्याच दौऱ्यात जाहीर केली. सिंधुरत्न विकास योजनेत कोणतीही आर्थिक तरतूद नव्हती. कधीही बैठका नाही की काही काम नाही. असेच या सिंधुरत्न विकास मंडळाची रचना आणि योजना केवळ कागदावरच राहिली. पर्यटन विकासासाठीही भरीव निधी मिळणे अपेक्षित होते. फक्त हजारो कोटींच्या घोषणा कोकणासाठी देण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात काही घडलेच नाही. याचे कारण कुणाचाही पायपोस कशातच नव्हता. कोकणच्या विकासासाठी नेमके काय करायचे आहे, याचे कोणतेही नियोजन आणि धोरणच नव्हते. कोकणसाठी काही करण्याची मनापासून तळमळ असेल, तर त्याचे प्रतिबिंब विकासकामात दिसले पाहिजे. जनतेसमोर भूलभुलैया निर्माण करून काही काळ संभ्रमित करता येऊ शकते; परंतु त्या पलीकडे जेव्हा वास्तवतेचे भान येते, जाणीव होते तेव्हा घोर फसवणूक झाल्याचे चित्र समोर येते. जो लोकप्रतिनिधी चांगलं काम करतो, विकास करतो, जनतेशी प्रामाणिक असतो, त्याचे काम जनतेसमोर उभे असते. सांगावे किंवा दाखवावे लागत नाही. लोकच अशा चांगल्या कामाची दखल घेतात. चर्चा करतात; परंतु जेव्हा भाषणातून फक्त आकडेवारी सांगितली जाते. तेव्हा यातली सत्यताही तपासली जाते. कोकणच्या विकासासाठी पर्यटन या एकाच विषयामध्ये सर्वांनाच काम करण्यासारखे खूप काही आहे. पर्यटन व्यवसायाला महत्त्व देऊन जर योग्यप्रकारे नियोजन केले, तर कोकणच महाराष्ट्राचे अर्थकारण बदलू शकते. एवढी ताकद पर्यटन उद्योगामध्ये आहे. पर्यटन हंगामात कोकणातील काही समुद्रकिनारे, हॉटेल व्यवसाय फार तेजीत असतो. अगदी गोव्याशी स्पर्धा करेल एवढी सुंदर पर्यटन स्थळे कोकणात आहेत. फक्त त्या पर्यटनस्थळावर अत्यंत आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कोकणातील रस्ते फारच खराब झाले आहेत. त्यांची दुरुस्ती होण्याची गरज आहे. अरुंद रस्त्यांमुळे येणारा पर्यटक फारच विचार करतो. रस्ते सुधारले पाहिजेत. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर कोकणातील रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकाच वेळी सर्व सुधारणा अपेक्षित नाहीत. मात्र, त्याचा शुभारंभ जरी झालेला दिसला तरीही कोकणी माणूस सुखावेल; परंतु यासाठी प्रामाणिक धडपड हवी. कोकणातील विशेषत: मालवणी फुडला खास मागणी आहे. देशी-परदेशी पर्यटकही कोकणच्या फुडला खास पसंती देतात. त्याचही नीट मार्केटिंग आपणाला करावे लागेल. आपणच आपल्या फुडला नाव ठेवली, तर त्याचा आणखी प्रसार कसा होणार? त्यासाठी प्रयत्न कोण करणार? येणारा पर्यटक कोकण सौंदर्य पाहून त्यात तो रमाला पाहिजे. पुन्हा-पुन्हा कोकणात यावसं त्याला वाटलं पाहिजे. कोकणच्या पर्यटन विकासाचा खऱ्या अर्थाने शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. कोकणातील आज दिसणारे पर्यटक हे कोकणातील त्यावेळच्या मोठ्या-मोठ्या महोत्सवांमध्ये दडले आहे. पर्यटन विकासाची नांदी १९९८ साली झाली. गेल्या २४ वर्षांत कोकणात खऱ्या अर्थाने पर्यटन बहरले आहे. पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. कोकणच्या विकासासाठी सर्वच बाबतीत प्रयत्न झाले पाहिजेत. कोकणच्या विकासाची गंगा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कोकणात सर्व दूर पोहोचली पाहिजे.

-संतोष वायंगणकर

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -