Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेगोरेगावच्या तरुणाची वसईत हत्या!

गोरेगावच्या तरुणाची वसईत हत्या!

अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवण्यासाठी दिली तांत्रिकाला सुपारी

वसई : अनैतिक संबंधातून पत्नीने पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना वसईतील वालीव पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पत्नीसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या पती-पत्नीला वालीव पोलिसांनी आणि वसई गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ४८ तासात अटक करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगांव पूर्व रिक्षा स्टॅण्ड ब्रीज जवळच्या खाडीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह २७ जानेवारी रोजी पाण्यात आढळून आला होता. वालीव पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता. जे. जे. हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम रिपोर्ट प्रमाणे या इसमाची हत्या झाल्याचे उघड झाले होते.

याप्रकरणी वालीव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांसमोर मयताची ओळख पटवून गुन्हा उघड करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. परंतू पोलीस तपासात मुंबईतील बांगुर नगर पोलीस ठाण्यात एक मनुष्य हरवला असल्याची तक्रार दाखल असल्याचे समजले. त्यानुसार चोकशी केली असता हरवलेला व्यक्ती तोच असल्याचे स्पष्ट झाल्यावर वसई गुन्हे शाखा कक्ष दोन आणि वालीव पोलिसांनी अवघ्या ४८ तासात गुन्हा उघड करुन, या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.

पोलीस तपासात अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मयत कमरुद्दीन मोहम्मद अन्सारी हा गोरेगांव मधील भगतसिंग नगर येथे चाळीत राहतो. या प्रकरणातील आरोपी व मयत कमरुद्दीनची पत्नी आयशा खान हिचे हरिश खान सोबत प्रेमसंबंध होते. पतीचा काटा काढण्यासाठी त्या दोघांनी त्यांच्या शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला निजाम पठाण आणि त्याची पत्नी सौफिया बिलाल पठाण या दाम्पत्यांना एक लाखाची सुपारी दिली. आरोपी बिलाल उर्फ मुल्ला हा तांत्रिक ही असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोघा पती पत्नीनी मयत कमरुद्दीनच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यानंतर त्याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन त्याची हत्या केली व नायगांवच्या खाडी किनारी फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास आता वालीव पोलीस करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -