
११ गर्भवती महिलांसह चालक जखमी
नंदुरबार : गर्भवती महिलांची तपासणी करून त्यांना घरी नेणारी रुग्णवाहिका अचानक उलटली. यात ११ गर्भवती महिलांसह चालक जखमी झाला. ही घटना शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील महाविद्यालया समोर घडली. गर्भवती महिलांना गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तेलखेडी आरोग्य केंद्रात ११ गर्भवती महिलांना तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. तपासणीनंतर या महिलांना परत घरी नेताना ही रुग्णवाहिका लोणखेडा येथे महाविद्यालया समोर अचानक उलटली. मोठा आवाज आणि महिलांच्या किंकाळ्या ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलांना सुखरूप बाहेर काढले. तीन महिलांना फ्रॅक्चर झाले आहे. तर तीन महिलांच्या डोक्याला मार बसला आहे. त्यांना तातडीने शहादा जिल्हा उप रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.