पुणे : कोयता गँगसह अन्य गुंडांचा पुण्यातील वाढता धूमाकुळ पाहता पोलिसांनी या गुंडांना पकडणार्या पोलिसांवर बक्षिसांची खैरात केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
अजित पवार म्हणाले, “एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते. तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये.”
हे पण वाचा : अरे पुण्यात चाललेय काय? गुंडांना पकडण्यासाठी बक्षिसांची खैरात
पुणे पोलिसांनी कोयता बाळगणार्याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना आखली आहे. या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर कोयता बाळगणार्याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना चांगलीच चर्चेत आली आहे.