केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उदयोगमंत्री नारायण राणे यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय अर्थसंकल्पावर केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उदयोगमंत्री नारायण राणे यांनी मत मांडताना अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. येत्या काही वर्षात भारत, जर्मनी आणि जपानला मागे टाकेल, असे विधान राणे यांनी केले आहे. राणे म्हणाले, ‘या अर्थसंकल्पाला मी सर्वंकष अर्थसंकल्प म्हणेन की, ज्यामध्ये देशाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. जागतीक पातळीवर देश तिसऱ्या क्रमांकावर जावा एवढी अर्थव्यवस्था सुधारली जावी, अशी पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे काही वर्षात भारत, जर्मनी आणि जपानलाही मागे टाकेल. केंद्राच्या प्रयत्नांमुळे दरडोई उत्पन्न आता ७९ हजारांवरुन १ लाख ९७ हजार रुपये इतके झाले आहे’.
उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीसाठी तरतूद केली जाते पण मुंबईसाठी काही तरतूद केलेली नाही, या प्रश्नावर राणे म्हणाले, मुंबईसाठी आम्ही तरतूद करायला लावू, मुंबईसाठी कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे पाहिजे ते आम्ही उपलब्ध करु आणि आमचे ते ऐकतील एवढा मला विश्वास आहे.
मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणार. कारण शिवसेनेने मुंबईला पूर्णपणे लुटले आहे.आता बस्स झाले. मुंबईला यांनी इतके लुटले की ‘यु’ आणि ‘आर’ नावाने हप्ते जात होते. विद्रुप करुन टाकली मुंबई, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला.
भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसरा क्रमांक गाठणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सादर केलेल्या सन २०२३- २४ या वर्षाच्या अर्थसंकल्पाचे सर्व देशभर सर्व स्तरातून स्वागत होत असून हा अर्थसंकल्प भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर नेईल, असा मला विश्वास वाटतो. जागतिक पातळीवरील स्पर्धेत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीपथावर नेण्याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच असून त्याचा आपणाला सार्थ अभिमान वाटतो. जपानचा जीडीपी ५. ०१ ट्रिलियन आहे, जर्मनीचा ३. ८५ ट्रिलियन आहे आणि भारताचा २. ७३ ट्रिलियन आहे. येत्या तीन ते चार वर्षात भारताचा जीडीपी ५ ट्रिलियन होईल अशी दिशा यावर्षीच्या अर्थसंकल्पात आहे व त्यासाठी आवश्यक त्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत. सन २०१३- १४ मधे भारतात दरडोई उत्पन्न ७९ हजार होते आता ते १, ९७, ००० झाले आहे. मोदी सरकारच्या काळात दरडोई उत्पन्न दुपट्टीपेक्षा जास्त झाले आहे.
तसेच जीडीपीही वाढला आहे. याच वेगाने भारत निश्चितच जगात तिसऱ्या क्रमांकावर पोचेल असा आपल्याला विश्वास वाटतो.सन २०१४ मधे भारत जगात दहाव्या क्रमांकावर होता, आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा व त्यांनी अर्थव्यवस्थेला दिलेली गती यामुळेच हे साध्य झाले आहे. यंदाचा अर्थसंकल्प सर्वंकष आहे. सर्व क्षेत्रांचा विकास साधणारा आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा आहे. गरीबी दूर करणारा, मध्यम वर्गीयांना ताकद देणारा,महिलांना सबलीकरण करणारा, गरीब व दुर्बल घटकांना आधार देणारा आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पाचे देशात सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु व मध्य उद्योग क्षेत्राला विशेष महत्व दिले आहे. त्यासाठी या क्षेत्राला भऱीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थंसंकल्पाने उद्योजकांना उत्तेजन मिळेल, नवे उद्योजक निर्माण होतील, गुंतवणूक वाढेल, रोजगार वाढेल व उत्पन्नही वाढेल, अशी मला खात्री वाटते. उद्योग क्षेत्राला महत्व दिल्यामुळे जीडीपी वाढेल व त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. बारा बलुतेदारांसाठी यंदाच्या अर्थंसंकल्पात अर्थमंत्र्यांनी खास योजना मांडली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जाहीर केली आहे. कुशल उद्योग- हरित उद्योग ही संकल्पना आहे. अधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल प्रशिक्षण, ब्रँडचा प्रचार, स्थानिक व ग्लोबल बाजारपेठ मिळवून देणे, अनुसुचित जाती जनजाती, ओबीसी, तसेच महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे. सार्वांगिण, सर्वसमावेशक, शाश्वत विकासाची हमी देणारा अर्थसंकल्प असेच त्याचे वर्णन करावे लागेल.