Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीठाणे

महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण

महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण

ठाणे: संपूर्ण देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर, ग्रुप प्रमुख श्री कार्लो, संशोधन विभागाच्या प्रमुख श्रीमती क्लेअर, युनिट प्रमुख सुधीर भंडारे, माजी आमदार विजय चौघुले, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन लोकांच्या आरोग्यसाठी मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. सँडोज कंपनीने कोवीड काळात मोठे सहकार्य केले. या काळात रोगप्रतिकारक औषधांची गरज व महत्त्व कळून आले. सँडोज कंपनीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषध निर्मिती व संशोधनाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारत आहोत. तेथे गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. सँडोज कंपनीने तेथे गुंतवणूक करून योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.


संडोज इंडिया ही कंपनी औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. आज भूमिपूजन झालेल्या प्लँटसाठी कंपनीने सुमारे २५० कोटींची गुंतवणूक करणार असून येथे जेनेरिक औषध निर्मिती होणार आहे. यामध्ये सुमारे ५०० ते ६०० नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. वर्षभरात हा प्लँट सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युनिट प्रमुख भंडारे यांनी स्वागत केले व आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर यांच्यात नव्या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली.

Comments
Add Comment