मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना शेअर बाजारात सकारात्मक चित्र पहायला मिळाले. अदाणी समूहावर झालेल्या आरोपामुळे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये पडझड सुरू होती. परंतू आज बुधवारी सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. निर्मला सीतारमन यांनी भाषणाची सुरुवात करताच सेन्सेक्समध्ये १००० अंकांनी उसळी पाहायला मिळाली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये २५० अंकाची वाढ पाहायला मिळाली. मात्र संपूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यावर त्याचे विश्लेषण जसे सुरु झाले, जशा संमित्र प्रतिक्रिया या अर्थसंकल्पाबाबत यायला लागल्या तसा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आणि निफ्टीमध्ये घसरणीला सुरुवात झाली. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १६२ वाढ होत ५९ हजार ७0८ वर बंद झाला तर निफ्टी हा ४६ अंकांनी घसरत १७ हजार ६१६ वर स्थिरावला.
अर्थसंकल्पात पर्यटनावर भर दिल्याने हॉटेल समभाग वधारले. या समभागांनी ८ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्याचप्रमाणे रेल्वे क्षेत्राशी संबंधित समभागातही तेजी दिसून आली. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी २.४ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी भांडवली खर्चाची तरतूद केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या खर्चात ६६ टक्के वाढ झाल्यामुळे सिमेंटच्या शेअर्सला फायदा झाला. त्यानंतर इंडिया सिमेंट्स, रामको सिमेंट्स, श्री सिमेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट्सच्या समभागात ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र, मोठ्या कंपन्यांच्या समभागांना प्रतिसाद चांगला मिळाला नाही. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हने सर्वाधिक ५.५० टक्क्यांनी घसरण केली. एसबीआयच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. इंडसइंड बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँक, टायटन, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स १ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान घसरले.
याआधी २०१३ पासूनचा मार्केट ट्रेंड पाहिला तर लक्षात येथे की सहा वेळा सेंसेक्समध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. तर सहा वेळा सेंसेक्स कोसळला होता.