राष्ट्रसेवा समितीचे कार्य कोकणातही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील महिला अनेक वर्षं करीत आहेत. त्यातीलच एक ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणजे रत्नागिरीच्या विद्याताई पटवर्धन आणि त्यांच्यासह रत्नागिरीमध्ये काम करीत असणाऱ्या अनेक समितीच्या कार्यकर्त्या. विद्याताई पटवर्धन यांच्या प्रेरणेतून व सुनंदाताई देवस्थळी, शोभाताई गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजातील महिलांचे, लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक, सांस्कृतिक, अाध्यात्मिक बळ देण्यासाठी आपण अशी एक संस्था स्थापन करावी, असं रत्नागिरीतील राष्ट्रीय समविचारी महिलांनी मनावर घेतलं आणि त्यातूनच संस्थेची स्थापना झाली. समितीमध्ये रेणुका मातेचे पूजन केले जाते. कारण दैवी शक्ती, भक्ती आणि स्त्रियांमधील धैर्याचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे रेणुका मातेचं नाव संस्थेला द्यावं असं चित्राताई जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे संस्थेला रेणुकामातेचे नाव देण्यात आले. शैक्षणिक कार्य, आरोग्य मदत, नैसर्गिक आपत्ती विमोचन तसेच सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त गोष्टी या दृष्टीने महिलांचे सबलीकरण व सशक्तीकरण व्हावे या हेतूने या संस्थेची स्थापना झाली. महिलांना सक्षम आणि सुसंस्कारी बनवण्याबरोबरच अवयव दानाचे महत्त्व एका कार्यक्रमानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच देहदान- अवयवदान याबद्दल समाज जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात झाली. आतापर्यंत संस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ ४२ जणांनी अवयव दानाचे फॉर्म भरले आहेत. संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतः फॉर्म भरून त्याची सुरुवात केली आहे. चिपळूण इथल्या डेरवण इथल्या रुग्णालयातील ताईंमार्फत अवयव दानासाठी भरलेले फॉर्म पुढच्या प्रक्रियेकरिता पाठवले जातात. संस्थेमार्फत भरायचा फॉर्म उपलब्ध करून दिला जातो आणि तो नंतर रुग्णालयात पाठवला जातो.
महिलांच्या रोजगारासंबंधी माहिती देणारे व्याख्यानपर कार्यक्रम आयोजित केले जातात. अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत खाद्य वस्तू त्याबरोबरच आपत्ती निवारण कक्षाची उभारणी करणे, अशी कामं केली जातात.मध्यंतरी दापोली तालुक्यातील ‘निसर्ग’ वादळाने त्रस्त झालेल्या ‘देहेण’ गावाला दत्तक घेऊन गावातील लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा संस्थेकडून केला गेला होता. तसेच वर्षभर त्यांच्याशी संपर्क ठेवून जिन्नस वाटप, साड्या वाटप इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. जवळजवळ वर्षभर पाठपुरावा ठेवून रत्नागिरीतल्या महिलांकडून जुन्या साड्यांची पायपुसणी शिवून घेऊन सुद्धा ती पाठवण्यात आली होती. तिथल्या ग्रस्तांना त्यांना जी गरज असेल, ती मदत करण्यात येत होती. एकदा मदत करून संस्थेतील कार्यकर्त्या थांबत नाहीत, तर तिथल्या वादळग्रस्तांशी नियमित संपर्क ठेवून त्यांना गरज असलेली मदत नंतरही केली जाते. केवळ कोकणातच नाही तर मध्यंतरी कोल्हापूर इथे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकजण पाणी आणि विजेविना अडकून पडले होते. घरातील सर्व वस्तू, जिन्नस भिजून त्यांचं नुकसान झालं होतं. पूरग्रस्तांना सतरंज्या, सॅनिटरी पॅड यांचा पुरवठा, चिपळूण पूरग्रस्त महिलांना आवश्यक असणारी अंतर्वस्त्र, परकर, गाऊन पाठवले होते. यांच्यासोबत शिवणयंत्रे व घरघंटीचे वाटप करण्यात आले होते. त्याशिवाय शिवणयंत्र आणि घरघंटीचा उपयोग करून महिला आज अर्थाजन करीत आहेत. त्यांना थोडेफार काम मिळवून देण्यास कार्यही संस्थेतल्या कार्यकर्त्या करीत असतात. तसेच त्यांच्याबरोबर सातत्याने संपर्कात राहत असतात. कोव्हिडच्या काळात सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे नाश्त्याचे वाटप करण्यात आले होते. याच काळात अनेकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केला. तंत्रज्ञानाचा वापर करून “रेणुका प्रतिष्ठान ऑनलाइन” असा एक वाॅट्सअप ग्रुप आहे, त्यावर महिला आपल्या विविध उत्पादनांची माहिती देतात. एकमेकीला मदत करतात. ग्राहक मिळवून देतात. खाद्य पदार्थ, कापडी पर्स पिशव्या, स्वदेशी फिनेल, साबण, शोभेच्या वस्तू, रूखवत अशा अनेक वस्तूची खरेदी विक्री यामार्फत होते.
संस्थेमार्फत स्थापनेपासून आजमितीपर्यंत कागदी पिशव्या, मास्क, कापडी पिशव्या, परकर-पोलके, बाळंतविडे बनवून त्यांची विक्री करणे असा उपक्रम सुरू आहे. चिपळूण भागात शिवानी यंत्र घरघंटी यांचं वाटप नुसतं करून संस्थेचे काम थांबत नाही, तर त्यांना काम देखील मिळवून दिलं जातं आणि त्यामुळे महिलांच्या हाताला काम तसेच आर्थिक मदतही होत असते. संस्थेची स्थापना होऊन पाच वर्षं झाली आहेत. संस्थेने स्वतःचे दोन खोल्यांचे छोटे कार्यालय उभं केलं आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम तसंच लहान- मोठ्या बैठका आयोजित केल्या जातात. अशा रीतीने स्थानिक तसेच जिल्ह्यातील विविध आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी संस्थेच्या महिला कार्यरत असतात आणि अशाच प्रकारचे कार्य पुढे सुरू ठेवायचे आहे.
-शिबानी जोशी
[email protected]