Monday, February 17, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेउल्हास नदी पात्रात पुन्हा जलपर्णीचा उद्रेक!

उल्हास नदी पात्रात पुन्हा जलपर्णीचा उद्रेक!

'चला जानुया नदीला' अभियान कागदावरच!

जलपर्णी व सांडपाण्यामुळे ३५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

बाळासाहेब भालेराव

मुरबाड : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गाजवळ ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी समजली जाणारी उल्हास नदी सध्या प्रचंड प्रमाणात प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कर्जत, नेरळ भागातून वाहणार्‍या या नदीत बदलापुर, भिसोल, आपटी बंधारा, रायते नदी पुल, कांबा, वरप मोहना पंप हाऊस या भागात पाण्यात वाहत येणारी जलपर्णी मोठी डोकेदुःखी ठरत आहे. नदीवर जलपर्णीचा हिरवा गालिछा पसरला आहे. नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींकडे शासनाचे व प्रदूषण मंडळाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. अनेक वेळा प्रसारमाध्यमांमधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन स्तरावर आजतागायत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उल्हास नदीला सध्या जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदी पात्रात पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाली आहे. तसेच अनेक भागात नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत येत असल्याने नदीतील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

उल्हास नदीचा उगम लोणावळा भागातून होतो. डोंगरातील पाणी उल्हास नदीला येऊन मिळते. याच पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांना उल्हास नदीतून पाणी योजना सुरू आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी याच उल्हास नदीचा आधार आहे. परंतु, सध्या उल्हास नदीला जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. बहुतांश पाणी योजनांना फिल्टर प्लांट नसल्याने पाईपद्वारे येणारे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने यात आता अधिकच भर पडली आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना दुषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्यावरदेखील परिणाम होणार आहे. त्यामुळे अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच सामाजिक कार्यकर्ते नदी स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार का, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

शहरातून व गावातून वाहत येणारे नाले-गटारे, विविध कारखान्यातील केमिकल युक्त पाणी, प्लास्टिक, टाकाऊ पदार्थ सर्रासपणे नदी पात्रता सोडले जातात. याबाबत प्रदूषण मंडळाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे. मागच्या वर्षी सुद्धा नदी पात्रता मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उपाय योजना करून जलपर्णी कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच मागील चार ते पाच महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी दालनात बैठक होऊन ‘चला जानुया नदीला’ या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नद्या प्रदूषण मुक्त करणार, अशी घोषणा केली. परंतु ही योजना कागदावरच असून शासनाचे या योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले दिसते.

ही योजना केवळ कागदावरच असून ठाणे जिल्ह्यात लवकरात लवकर राबवणे गरजेचे असून जिल्ह्यातील नद्या प्रदूषण मुक्त केल्या पाहिजेत. दूषित पाण्यामुळे जवळपास ३५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जलपर्णीचा तात्काळ बंदोबस्त करावा व नद्या प्रदूषणमुक्त कराव्या यासाठी ठाणे जिल्हाधिकारी व जलसंपदा व पर्यावरण मंत्री यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून हा गंभीर विषय तात्काळ सोडवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस राम सुरोशी आणि उल्हास नदी बचाव कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -