मुंबई/माथेरान : हनिमूनसाठी माथेरानला गेलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील मोहम्मद कासिफ इम्तियाज शेख या तरुणाचा घोड्यावरुन पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोहम्मद शेख त्याची पत्नी आणि दोन मित्रांसह माथेरान येथे गेले होते. त्यावेळी सगळेजण घोडेस्वारीसाठी निघाले होते. त्यावेळी मोहम्मदचा घोडा उधळला आणि धावत सुटला. यात मोहम्मद खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. माथेरान येथील सन अँड शेड हॉटेलजवळ ही घटना घडली.
त्यांच्या मित्रांनी त्याला जखमी अवस्थेत माथेरान येथील बी. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथून उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांना दीड तास लागला. या दरम्यान अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मोहम्मद शेखचा मृत्यू झाला.