Friday, February 14, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेका होतात अपघात? 'ब्लॅक स्पॉट' म्हणजे काय?

का होतात अपघात? ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे काय?

टॅंकर अपघाताचे वर्षभरात अकरा गुन्हे दाखल

  • अनिकेत देशमुख

मीरारोड : मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाने ठिकठिकाणी अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट फलक लावलेले असले तरी वाहन चालकांचा निष्काळजीपणा आणि बेपर्वाईमुळे अपघात होतात. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष वेधले असून चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहने सुरक्षित चालवण्याचे आवाहन केले आहे.

वसई विरार परिसरात टॅंकर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून निदर्शनास येते. मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयांतर्गत गेल्या २०२२ या वर्षात टॅंकर अपघाताचे एकूण अकरा गुन्हे दाखल असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामार्फत देण्यात आली आहे.

मीरा भाईंदर वसई विरार शहरात २०२० साली एकूण मोटार अपघाताची संख्या १०२ इतकी होती व त्यात मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या १२ व जखमींची संख्या ८३ होती. मात्र मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरु होताच या संख्येत घट झाली आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी २०२० साली एकूण अपघात व अपघातात मृत्यमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी पहाता त्यात घट झाली पाहिजे, असे वाहतूक विभागाला सांगितले होते. त्यानुसार अपघात कसे कमी होतील याकडे लक्ष देण्यात आले असून २०२१ या पूर्ण वर्षभरात मोटार अपघाताची एकूण संख्या १२० व त्यात मरण पावणाऱ्याची संख्या १५ व जखमींची संख्या ९६ होती. २०२२ या वर्षात मोटार अपघातांची एकूण संख्या १५० व जखमी ९२ व मरण पावणाऱ्याची संख्या ५९ आहे.

मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातर्फे नागरिकांना मोटर सायकल चालवताना हेल्मेट परिधान करणे तसेच रोड क्रॉस करताना घाई न करता वाहनांच्या वेगाचा अंदाज घेऊन मगच रस्ता क्रॉस करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांमुळे होणारे अपघात व प्राणहानी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत अपघात होणाऱ्या मुख्य ठिकाणी वाहन चालकांना दुरूनच ब्लॅक स्पॉट समजावेत याकरता बोर्ड लावण्यात आले आहेत. मीरा भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या अंतर्गत १६ ब्लॅक स्पॉट असून त्या सर्व ठिकाणी वाहन चालकांना दिसतील अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहेत. वाहन चालकांना दुरूनच पुढे ब्लॅक स्पॉट हद्द असल्याचे दिसावे व त्याचबरोबर ब्लॅक स्पॉट गेल्यानंतर ब्लॅक स्पॉट हद्द समाप्त झालेली आहे असे फलक ५०० मीटर वर लावण्यात आले आहेत. मीरा भाईंदर शहरात सध्या दिल्ली दरबार, सगनाई नाका, सिल्व्हरपार्क, हाटकेश या ठिकाणी हे ब्लॅक स्पॉट बोर्ड लावण्यात आले आहेत. आयुक्तलया मार्फत वाहतुक सप्ताह कार्यक्रम राबवत त्यांच्या माध्यमातून लोकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

शासनाकडून रस्ते अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीदेखील वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. जवळपास ९० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. चारचाकी वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, नशेत वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वेगमर्यादा न पाळणे अशा कारणामुळे अपघात होत आहेत.

वाहनचालकांनी वाहनांच्या नियमाचे सर्वांनी पालन करायला हवे जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडणार नाही व राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर दिलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे व सोबतच वेगमर्यादा देखील राखणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्तालयातर्फे आवाहन केले आहे.

‘ब्लाइंड स्पॉट’ व ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे काय?

बहुतांश रस्ते अपघात ‘ब्लाइंड स्पॉट’ला वाहनांची हाताळणी व्यवस्थित न केल्याने होतात. म्हणूनच चालकांनी अशा ‘ब्लाइंड स्पॉट’ला वाहने हाताळताना हुशारी किंवा तत्परता दाखवणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंगचा नियम असा, की आजूबाजूला पुरेशी जागा असल्याशिवाय किंवा पाठीमागून एखादे वाहन येत नाही, याची खातरजमा केल्याशिवाय लेनमधून बाहेर पडू नये. या सर्व गोष्टी आपण कारच्या आतील तसेच बाहेरील आरशाच्या साह्याने खात्री करू शकतो. परंतु त्यातही मर्यादा असतात. आपल्या बाजूने येणारी-जाणारी वाहने आरशांतून आपल्याला दिसतात. परंतु, वळण असलेल्या ठिकाणी पुढील काही भाग तसेच आरशाच्या साह्यानेही जो पाठीमागील किंवा आजूबाजूचा भाग आपल्या नजरेत येत नाही, त्यालाच ‘ब्लाइंड स्पॉट’ म्हणतात. म्हणूनच ब्लाइंड स्पॉट धोकादायक आणि अनेक अपघातांचे कारण ठरतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -