Thursday, September 18, 2025

वसंत पूजा आणि मंत्र जागर

वसंत पूजा आणि मंत्र जागर

मागील लेखात आपण श्री समर्थांचा काही चरित्र भाग पाहिला. याच चौथ्या अध्यायामध्ये शेगाव जवळच असलेल्या चिंचोली ग्रामाच्या एका विप्राची कथा संत कवी दासगणू महाराज यांनी ग्रंथीत केली आहे.

हा माधव विप्र चिंचोली गावचा होता. या विप्राचे वय साठ वर्षांच्या पुढे होते. संसारामध्ये असताना या माधव विप्राने हमा धुमीचा संसार केला. कधीही हरीचे स्मरण केले नाही. अशातच त्याचे कांता पुत्र मारून गेले. आता माधवाला देव आठवले. विरक्ती आली आणि अशी स्थिती झाल्यावर शेगावी आला. दासगणू महाराज म्हणतात... प्रारब्धाच्या पुढारी। कोण जातो भूमीवरी?। ब्रह्मदेवे जी का खरी। लिहिली अक्षरे तेच होय।। अशा उद्विग्न स्थितीत महाराजांच्या द्वारी येऊन बसला आणि अन्नपाणी त्यागून उपोषण करू लागला. नारायणाचे नाम घेत बसून राहिला. असा एक दिवस पार पडला. श्री महाराज त्याला म्हणाले, हे असे करणे योग्य नाही. या पूर्वीच तू परमेश्वराचे नाम स्मरण का केले नाहीस? हा प्रसंग श्री दासगणू महाराज ओवीमधून कथन करतात... ऐश्यापरी एक गेला। दिवस परी नाही उठला। तई महाराज वदले तयाला। हे करणे उचित नसे ।। १२।। हेच हरीचे नामस्मरण। का न केले मागे जाण। प्राण देहाते सोडून। जाता वैद्य बोलाविसी ।। १३।। तरुणपणी ब्रह्मचारी। म्हातारपणी करिसी नारी। अरे वेळ गेल्यावरी। नाही उपयोग साधनाचा ।। १४।। जे करणे ते वेळेवर । करावे की साचार । घर एकदा पेटल्यावर। कुप खणणे निरर्थक ।।१५।।

तरीही माधवाचा हट्ट सुरूच होता. शेगावचे कुलकर्णी स्वतः माधवास बोलावून म्हणाले की, माझ्या घरी जेवायला चला. उपोषित राहू नका. हे म्हणणे सुद्धा माधवाला पटले नाही. त्याने उपोषण सुरूच ठेवले.हा तसे ऐकणार नाही, असे पाहून श्री महाराजांनी त्याला चमत्कार दाखवला. दोन प्रहर मध्य रात्रीला श्री महाराजांनी भयंकर रूप धारण केले आणि माधवाच्या अंगावर धावून गेले. ते रूप पाहून माधव घाबरला. त्याला धडकी भरली. माधव तेथून पळू लागला. असे पाहून श्री महाराजांनी सौम्य रूप धारण करून गर्जून माधवास बोलले माधवा हेच का तुझे धीटपण आहे काय? तू देखील काळाचेच भक्ष आहेस. रात्र झाली दोन प्रहर। तमे आक्रमिले अंबर । निशीचा तो शब्द किर्र । होऊ लागला वरच्या वरी ।। २२।। आसपास कोणी नाही । ऐसे पाहून केले काही। कौतुक ते लवलाही । स्वामी गजननानी ।। २३।। रूप धरिले भयंकर । दुसरा यमाजी भास्कर । आ पसरून माधवावर । धावून आले भक्षावया ।। २४ ।। हा सर्व प्रकार पाहून श्री महाराजांनी सौम्य रूप धरले. माधव महाराजांना विनयाने बोलला. महाराज माझी यम लोकाची वार्ता कृपया टाळा. हे जीवन मला नको. काही सुकृत पदरी होते। म्हणून पाहिले तुम्हाते। संत भेटी ज्याला होते। यमलोक ना तयासी ।। ३३।। ऐसे ऐकता भाषण । समर्थे केले हास्य वदन। महापतीत पावन। साधूच एक करिती की ।। ३४।। अशा प्रकारे श्री महाराजांनी माधवास बोध देऊन त्याचेवर अनुग्रह व कृपा केली. पुढे हा माधव विप्र महाराजांजवळच राहिला आणि त्याचे देहावसान देखील महाराजांचे सन्निध झाले. एकदा महाराजांना शेगाव येथे वसंत पूजा आणि मंत्र जागर करण्याची इच्छा झाली. ती त्यांनी आपल्या भक्तांना बोलून दाखविली. वैदिक ब्राह्मण बोलवा। मंत्र जागर येथे करवा । वेद श्रवणे देव देवा । आनंद होतो अतिशय ।। ४४ ।। ही स्वामींची इच्छा ऐकून शिष्य म्हणाले की, महाराज आपण जो सांगाल ती तयारी, खर्च करू. पण, एकच अडचण आहे. ती म्हणजे असे वैदिक ब्राह्मण येथे मिळणार नाहीत. ऐसे भाषण ऐकीले। शिष्य विनऊ लागले। ऐसे वैदिक नाही उरले। या आपल्या शेगावी ।।४६।। महाराज म्हणाले त्यावरी। करा उद्या तयारी । ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंत पूजेला ।। ४८।। लगेच भक्त कामास लागले. पूर्ण तयारी झाली. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या प्रहरी असे ब्राह्मण शेगावात आले. दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगावाला । जे पदक्रमजटेला । जाणत होते विबुध हो ।।१५१ ।। संत इच्छा पूर्ण करण्याकरिता काहीही कमी पडत नाही. संतांच्या जे मनी येत । ते ते पुरवी रमानाथ । कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ।। ५३ ।। अजून सुद्धा हे व्रत शेगावात चालविले जाते. असे अनेक पूर्वापार उपक्रम शेगावात नित्य सुरू असतात. महाराजांचे परम भक्त मंडळी व संस्थान हे व्रत, उत्सव आणि उपक्रम फार भक्तिभावाने साजरे करत असतात. त्याद्वारे असंख्य भाविक भक्तांना याचा लाभ मिळतो.

-प्रा. प्रवीण पांडे, अकोला
Comments
Add Comment