अलिबाग, सुभाष म्हात्रे : कोकण शिक्षक मतदारसंघासाठी रायगड जिल्ह्यात आज शांततेत मतदान पार पडले. सुमारे ९३.५६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्येच खरी सरळ लढत होत असल्याने विजयी गुलाल कोण उधळणार याकडचे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळी 8 वाजल्यापासून रायगड जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत १६.९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर १२ वाजेपर्यंत ४८.७८ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ७३.९६ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ९ हजार ४५० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये ४ हजार १४३ पुरुष शिक्षक, तर ५ हजार ३०७ महिला शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
काही अपवाद वगळले तर या मतदानसंघावर कायम भाजपप्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा राहिला आहे. सुरुवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या मतदारसंघातून निवडून आले होते. वसंत बापट आणि रामनाथ मोते यांनी प्रत्येकी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थानाला सुरुंग लावत पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे शेकापने खालसा केलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे विजयाची माळ कोण गळ्यात घालणार हे २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.