मोखाडा: मोखाडा शहरात प्रवेश करतांना नजरेत येणारा तलाव आहे, या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, “ I Love Mokhada”(‘आय लव्ह मोखाडा’) हा नामफलक चाकरमान्यांसह स्थानिकांसाठी सेल्फी पाईंट ठरत आहे. मोखाडा शहर स्वच्छ व सुंदर दिसावे, भविष्यात मोखाड्यात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत़.
दिवसभरातील कामाचे टेन्शन कमी करण्यासाठी मोखाड्यातील तलाव हा येथील नागरिक तसेच प्रवाशांचा सायंकाळी विरंगुळाचे ठिकाण ठरत होता़ ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कार्यालयातील कामानिमित्त व वैयक्तिक कामानिमित्त तालुक्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या निर्माण होत होती, परंतु अशा वेळेस मोखाड्याचा तलाव पुन्हा एकदा पार्किंगचे ठिकाण बनत असे़ मात्र, यावेळी मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून तलावाजवळ लावलेला “ I Love Mokhada ” हा नामफलक आता सेल्फी पाईंट ठरत आहे.
स्थानिक नागरिकांसह तालुक्याला येणाऱ्या चाकरमान्यांना तलावाजवळ लावलेल्या या नामफलकाचे कौतुक वाटत असून, बरेचजण येथे आपला सेल्फी काढून तो सोशल मीडियाद्वारे शेअर करीत आहेत़ तसेच बऱ्याचशा नागरिक, प्रवाशांनी आपले हे सेल्फी स्टेटसला सुध्दा ठेवले आहे. तर काही नागरिक आपआपल्या मोबाइलद्वारे नामफलकांसह स्वत:चा फोटो सेल्फीद्वारे चित्रबद्ध करीत आहेत, हे विशेष.