ठाणे : कळवा पुलावर लावण्यात आलेल्या ‘लबाड बोका ढाँग करतोय’ या बॅनरची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
कळवा मुंब्रा येथील नगरसेवकांना खुलेआम एक कोटीची ऑफर देऊन शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाचे “नगरसेवकांनो स्वतःला विकू नका! अशा आशयाचे होर्डिंग्ज कळवा पुल व नाका येथे रविवारी लावण्यात आले होते. हे ताजे असताना राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी कळवा जुन्या व नव्या पुलावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनेही होर्डिंग्जला प्रत्युत्तर म्हणून बॅनरच्या भाषेत चोख उत्तर देण्यात आले आहे.
“लबाड बोका ढोंग करतोय” नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले, मुंब्रा कळवा विकासाचे फुका लढता श्रेय, आयत्या पिठावर रेघोट्या हेच तुमचे ध्येय, तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे ही राहणार नाही” अशी टीका या होर्डिंग्जमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी बॅनरची लढाई म्हणजे निवडणुकीपूर्वीचा शिमगा असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.