Tuesday, July 1, 2025

डीवायएफआयतर्फे माहुली गडावर स्वच्छता मोहीम

डीवायएफआयतर्फे माहुली गडावर स्वच्छता मोहीम

शहापूर : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया तालुका शाखा वाडा व शहापूर (डीवायएफआय) तर्फे किल्ले माहुली गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत सुमारे २०० युवक युवतींनी सहभाग घेतला.


माहुली गडाच्या पायथ्यापासून स्वच्छता मोहीमेला सुरुवात करण्यात आली. माहुली गडावर वर्षभर पर्यटक, शिवप्रेमींची मोठ्या संख्येने ये-जा असते. त्यात थंडीच्या महिन्यात ही संख्या अधिक असते. पर्यटकांनी सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, जेवणाची पात्र गडावरच सोडल्यामुळे गडावर अस्वच्छता होत असते. या मोहिमेत प्लास्टिक, बॉटल, जेवणाचे पात्र इ. प्रकारचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.



कल्याण दरवाजा, पळसगड, हनुमान दरवाजा परिसर, धान्य कोठी, तलाव परिसर व महादरवाजाच्या पायरी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ पाण्याने धुऊन काढण्यात आला. गडावरील नैसर्गिक पाण्याचे झरे स्वच्छ आणि साफ केले असल्याने गडावर प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल आणू नयेत असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सेक्रेटरी भरत वाळंबा यांनी यावेळी केले.



या मोहिमेत राज्य कमिटी सदस्य प्रकाश चौधरी, तालुका सचिव भास्कर म्हसे, जिल्हा कमिटी सदस्य भरत वळंबा, वाडा तालुका अध्यक्ष बापू वाघात, जिल्हा कमिटी सदस्य लखमा बाबर, मनोज काकवा, रशीद शेख, आनंद रोज, चंद्रकांत वैजल, उत्तम बुधर, अंकुश रोज, अरुण घाटाळ, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments
Add Comment