Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआता होऊन जाऊ द्या, एकदाच्या निवडणुका!

आता होऊन जाऊ द्या, एकदाच्या निवडणुका!

सध्या मुंबईकरांना एकच प्रश्न सतावत आहे की, निवडणुका कधी होणार? कधी आम्हाला नवीन लोकप्रतिनिधी मिळणार? व आमच्या दैनंदिन समस्या सुटणार! गेले वर्षभर मुंबईकर लोकप्रतिनिधीविनाच आहेत. स्थानिक नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन लोकप्रतिनिधी नियुक्त होणे महिन्याभरात अपेक्षित असताना वर्ष पूर्ण होत आले तरीही ना निवडणुका झाल्या, ना निवडणुका होण्याची आशा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जनतेतूनही आता नाराजीचा सूर ऐकू येत आहे व आजी-माजी इच्छुक लोकप्रतिनिधीही म्हणत आहेत, होऊन जाऊ द्या एकदाच्या निवडणुका !

वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर महिन्याभराच्या आत निवडणूक घेणे क्रमप्राप्त असते, मात्र सध्याची राजकीय अवघड परिस्थिती बघता निवडणुका लांबणीवर पडताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे सरकारने लोकसंख्येच्या आधारावर नऊ प्रभाग वाढवून २३६ केले होते. पण, राज्यात जून २०२२ मध्ये सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने प्रभागांची पूर्वीची २२७ ही संख्या ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणून शिवसेना त्या विरोधात न्यायालयात गेली आहे. ५ जानेवारी रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तारीख पे तारीख करत आता ही सुनावणीही बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल जरी आता लवकर लागला तरी ही पालिका निवडणूक या वर्षाखेरीस ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत जाऊ शकते. त्यातच शिंदे-फडणवीस यांनी आत्मविश्वास व नियोजनपूर्वक निवडणुकीची तयारी सुरू केल्याने वातावरण निर्मिती होऊन कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना, भाजप व आरपीआय (आठवले गट) या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विशेषत: शिंदे गट व भाजप यांच्यात एक कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची संघटनात्मक कार्याची जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांवर यापूर्वीच सोपवली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या यादीत आता काही नावे हळूहळू वाढत जात आहेत. शिंदे गटाची ही तयारी पाहूनच निवडणुका लवकर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे किती माजी नगरसेवक शिंदे गटात उडी मारणार, हे बघणे खरेच औत्सुक्याचे असेल. या बाबतीत सध्यातरी किमान ४० नगरसेवक तरी शिंदेगटात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. खरी परिस्थिती यापेक्षा कितीतरी अधिक असण्याचा अंदाज आहे. खरे तर ही पालिका निवडणूक पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. राजकारणात कधीही, काहीही होऊ शकते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे पालिका निवडणुकीत एकत्र येतील असे कोणतेही चित्र आज तरी दिसत नाही, आयत्या वेळी चित्र काय असेल त्यावरूनही पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याचा अंदाज बांधता येईल, सध्या तरी सर्व राजकीय पक्षांचे लक्ष निवडणुका कधी होतील याकडेच लागले आहे.

मुंबई महापालिकेत १९८५ सालापासून २५ वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला साद दिल्याने मुंबईतील मराठी माणसाला आपल्याकडे वळवण्यात यश आले, मात्र गेल्या काही वर्षांत परिस्थितीत बराच बदल झाला आहे. शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बरीच दूर गेली आहे.

केवळ मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकणे शिवसेनेला शक्य होणार नाही, गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या चुकीच्या धोरणांमुळे बहुसंख्य मराठी माणसांवर मुंबई सोडून जाण्याची वेळ आली, याचा शिवसेनेला आगामी निवडणुकात जबरी फटका बसणार हे निश्चित. पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कडवी झुंज देत जवळपास त्यांच्या बरोबरीने जागा जिंकल्या होत्या. त्यावेळेस सेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसेवक जिंकून आले होते. भाजपने मनात आणले असते, तर त्याचवेळी मुंबई महापालिका ताब्यात घेतली असती; परंतु राज्यात असलेले भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर असल्याने भाजपने सेनेला पालिकेत प्रत्यक्ष सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देत सत्ता स्थापनेची संधी दिली होती हे शिवसेना हेतुपुरस्सर विसरली.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची जरी आघाडी झाली व तिन्ही पक्ष जरी एकत्रितपणे भाजप-शिंदे गटासमोर उभे राहिले तरी, एकीकडे भाजपचा विस्तार पाहता आणि शिंदे गटाने भाजपला दिलेली साथ पाहता, येणारी पालिकेची निवडणूक चुरशीची होऊन भाजप-शिंदे गटाचा महापौर बसेल यात काडीचीही शंका नाही. दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे ही शिवसेना विरोधात उभे ठाकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली, त्यांच्याबरोबर मुंबईतील काही खासदार यांनीही सेनेची साथ सोडली, त्याचबरोबर शिवसेनेचे काही आमदार ही शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात आले. मुंबईला शिवसेनेला याचा फटका बसणार हे निश्चित आहे. तसेच पालिका निवडणुकीची तारीख घोषित झाल्यानंतर तयारीत असलेले शिवसेनेतील नगरसेवक व इतर पक्षांतील माजी नगरसेवकही भाजप, शिंदे गटात सामील होतील. त्यामुळे साहजिकच मुंबईत शिंदे गटाची ताकद आपसुकच वाढणार आहे, याचा फायदा भाजपला पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी होणार हे निश्चित आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुंबईत फारशी नाही. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सळसळती ऊर्जा देऊन गेला. भाजप नेते अमित शहा यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन पालिका निवडणुकीचे पडघम वाजविण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी भाजपने मुंबईत १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिंदे गटाची ताकद व इतर घटकांमुळे सध्या तरी भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. म्हणूनच कार्यकर्ते असो वा आम जनता आता एकच नारा लावत आहेत, आता होऊन जाऊ दे एकदाच्या निवडणुका!

– अल्पेश म्हात्रे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -