आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करायचे, असे जाहीर केले आहे. याचे नेमके उद्दिष्ट काय, तृणधान्य नेमकी कोणती, त्यांचा आहारात समावेश कसा असायला हवा, हे या लेखात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात.
तृणधान्ये : तृण कुलातील (ग्रॅमिनी) वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे. त्यांची लागवड मुख्यत्वे करून त्यांच्या पिष्टमय बियांसाठी केली जाते. तृणधान्यांचा उपयोग मनुष्याच्या पोषणासाठी, जनावरांच्या खाद्यांत आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्चसाठी केला जातो. गहू, भात, मका, राय, ओट, सातू, ज्वारी आणि ज्वारी वर्गातील पिके, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी यांचा तृणधान्यांत समावेश होतो. यांतील बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी ही बारीक तृणधान्ये (मिलेट) आहेत. काही शास्त्रज्ञ ‘मिलेट’ हा शब्द दुय्यम प्रतीच्या तृणधान्यांसाठी वापरतात आणि गहू, भात, राय, ओट व सातू यांखेरीज सर्व तृणधान्यांचा समावेश त्यांत करतात. सर्व तृणधान्ये वर्षायू (एक वर्ष जगणारी) आहेत. गहू, राय, सातू व ओट ही पिके जगातील थंड हवामानाच्या प्रदेशांत आणि इतर सर्व पिके उष्ण अगर समशीतोष्ण भागांत होतात.
सातू : हे फार पुरातन काळापासून लागवडीत असलेले तृणधान्य आहे. ते सर्वांत पुरातन तृणधान्य आहे असे काहींचे मत असून ५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीपासून ते लागवडीत असावे असे मानतात. ऋग्वेदात त्याचा उल्लेख यव असा केलेला आढळतो. भारतात उ. प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा व राजस्थानात या पिकाची लागवड मनुष्याच्या खाद्यान्नासाठी करतात. सातूचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळून त्याच्या रोट्या करतात. तसेच त्यापासून बिअर आणि व्हिस्की ही मद्ये तयार करतात
ज्वारी : हे तृणधान्य ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,००० वर्षे लागवडीत होते. याची लागवड आफ्रिका, भारत, चीन, मँचुरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर अनेक देशांत केली जाते. भारतात भातानंतर मनुष्याचे अन्नधान्य म्हणून ज्वारीच्या क्रमांक लागतो. भारतातील ज्वारीच्या क्षेत्रापैकी ३४% क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
बाजरी : हे बारीक तृणधान्य भारत, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील काही देशांत पिकते. भारतात ते ज्वारीच्या खालोखाल महत्त्वाचे असून त्याची लागवड विशेषकरून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशात होते. ज्वारीपेक्षा बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
नाचणी : नागली. दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे बारीक तृणधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक व शक्तिदायक समजले जाते व त्यात प्रथिने व कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असतात. मधुमेही लोकांना ते उपयुक्त समजले जाते. याचा विशेष म्हणजे साठवणीमध्ये ते इतर तृणधान्यांपेक्षा अनेक वर्षे न किडता टिकते.
वरी : हे लवकर पिकणारे व रुक्षताविरोधक (अवर्षणाला तोंड देऊ शकणारे) पीक असून दुष्काळी भागात अगर अवर्षणाच्या काळात लागवडीसाठी योग्य आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत हे पीक लागवडीत आहे.
राळा : हे बारीक दाण्याचे रुक्षताविरोधक पीक मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात लागवडीत आहे. २,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत या पिकाची लागवड होऊ शकते.
कोद्रा : चिवट आणि अतिशय रुक्षताविरोधक बारीक तृणधान्य. ते तामिळनाडू व उ. कर्नाटक या दोन राज्यांत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागांत लागवडीत आहे.
सावा : हे गरिबांची धान्य असून रुक्षताविरोधक तसेच पाणथळ जमिनीत वाढणारे, बारीक तृणधान्य थोड्या प्रमाणावर लागवडीत आहे.
तृणधान्यांचे आहारातील स्थान : पोषण गुणधर्मांच्या बहुतेक बाबतींत सर्व तृणधान्ये एकमेकांशी मिळती-जुळती आहेत. यातील तंतुमय पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी फायदेशीर. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. टाइप २ मधुमेहास प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. मूत्रपिंड, यकृत आणि रोगप्रतिकारक प्रणाली सक्षम होण्यासाठीही महत्त्वाचे धान्य म्हणूनही सध्या हे धान्य खूप चांगले आहे. पोषक अशा या तृणधान्यांचा आहारात उपयोग करताना मात्र ती भाजून, स्नेह वापरून करणे योग्य. कारण ती रूक्ष आहेत. एकूण मर्यादेत, आपल्या तब्येतीला नेमके कोणते मानवते ते पाहून विशिष्ट काळापुरते तृणधान्य आहारात घेतल्यास फायदेशीर ठरू शकतील.
-डॉ. लीना राजवाडे