हळूवार शब्द मनावर फुंकर घालतात, कटू शब्द दुखावतात. अशी एक म्हण आहे की, न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता व बोललेल्या शब्दांचे गुलाम! कधी-कधी भांडणांमध्ये एकमेकांवर आरोप-आरोपी करण्याच्या नादात व्यक्ती आपले भान विसरतात व असे शब्द मग घातक ठरतात. शब्द जपून वापरावेत, नाही तर मोठा अनर्थ घडू शकतो. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील प्रसंग!
द्रौपदी महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोलली. ‘अंधे का पुत्र अंधा’ व हसली. दुर्योधनाच्या सर्वांपुढील अपमानाने त्याने सुडाप्रती तिचं वस्त्रहरण केलं; परंतु तिने भगवान श्रीकृष्णाला आर्त विनवणी केल्यावर ते द्रौपदीच्या मदतीला धावले. पण या प्रसंगानेच महाभारतात युद्ध सुरू झाले व रथी-महारथी त्यात ओढले गेले. म्हणूनच शब्द सांभाळून वापरावेत. आपल्या भारतीय संस्कृतीत शब्दांवर आधारित सणांचे महत्त्व विशद केले आहे. त्यातला एक सण म्हणजे मकर संक्रांत! मकर संक्रांत हा सण परस्परांमधील वैरभाव, राग, द्वेष विसरून उत्तम स्नेहभाव निर्माण व्हावा हा संदेश देतो. तिळगूळ घ्या गोड-गोड बोला, असे म्हणून आपण एकमेकांना तिळगूळ, तिळलाडू देतो.
टिळक शालेय विद्यार्थी असतानाचा एक प्रसंग! एकदा शाळेत शिक्षक बाहेर गेले असता मुलांनी शेंगा खाऊन टरफले वर्गातच टाकली. मास्तरांनी टरफले कोणी टाकली म्हणून विचारले असता कोणीच कबूल होईना. तेव्हा मास्तर प्रत्येकाला छड्या देऊ लागले. छडी खाण्याची वेळ टिळकांवर आली तेव्हा त्यांनी हात पुढे केला नाही. मास्तर म्हणाले, मग शेंगा कोणी खाल्ल्या त्यांची नावे सांग? ते म्हणाले, मी छड्याही खाणार नाही व कोणाची नावेही सांगणार नाही. मास्तरांनी टिळकांना घरी जाण्यास सांगितले व टिळक लगेच घरी निघून गेले. पुढेही आपल्या शब्दसामर्थ्यावर टिळकांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा चालू ठेवला. ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने,’ असे म्हणून संत तुकारामांनी अनेक अभंग रचले की, जे अजूनही मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागांत वाचले जातात. पालकांचे संस्कार मुलांच्या जडण-घडणीमध्ये फारच महत्त्वपूर्ण असतात.
कित्येक वेळा पालक आपल्या मुलांबाबत ‘गाढव तू बुद्धूच राहणार, तुला अक्कलच नाही, कधी शहाणा होणार रे तू?’ अशी अपमानास्पद विधाने वापरून मुलांना दुखावतात. त्यातून मुलांमध्ये एकलकोंडेपणा, न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असे शब्द टाळावेत. एखाद्या सावळ्या मुलीला पालकांनी, काळुंद्री म्हणून हिणवले की ती रडकुंडीला येते.
भरीस भर म्हणजे; कसं गं लग्नं व्हायचे तुझे? अशा शब्दांनी तिच्या भवितव्याबाबत ते असुरक्षितता प्रकट करतात. त्यातून तिचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यात तिची असलेली बुद्धिमत्ता झाकली जाते व रंगाला तेवढा उठाव येतो.
पण, हेच जर ‘माझी परी आहे. हुशार आहे, माझी लेक,’ असे म्हणून चांगल्या शब्दांनी तिचे व पालकांचे नाते आनंददायी होऊ शकते. शब्द हे जादूचे काम करतात. दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी आश्वासक शब्द फार महत्त्वाचे आहेत. शब्दांचे किमयागार, विनोदांनी इतरांना व स्वतःलाही हसवणारे पु. ल. देशपांडे देखील माणसांची मने म्हणूनच जिंकू शकले.
असे म्हटले जाते की, निसर्गाविषयी एकरूपता, प्रेम असणाऱ्या व्यक्ती झाडांशी बोलतात. त्यांना पाणी घालताना, त्यांची निगराणी करताना ते मनमोकळेपणाने झाडांशी, लतावेलींशी संवाद साधतात. त्यातून अनेकांनी आपल्याला खूप शांत व प्रसन्न वाटले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा, अशा आरोळीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशातल्या तरुणाईला ललकारी दिली व त्यांच्या ललकारीला प्रतिसाद म्हणून अनेक तरुणांनी स्वेच्छेने आझाद हिंद सेनेत उडी मारली. त्यातल्याच एक कॅप्टन लक्ष्मी सेहगल!
असे हे शब्दांचे सामर्थ्य! कधी-कधी व्यक्ती-व्यक्तींमध्ये इतके पराकोटीचे भांडण लागते की, ए माझ्याबरोबर सुडाचे राजकारण खेळू नकोस. असे एखादा सुनावतो. हे तर सारे शब्दांचेच खेळ! यांनी मला असे म्हटले, त्यांनी मला तसे म्हटले, असे शब्दांत गुरफटून जाऊन काही लोक आपले तासनतास विचारमग्न होऊन आपला वेळ अकारण घालवितात व त्रास करून घेतात. आपण प्रवास करताना मुंबईसारख्या शहरात कधी-कधी रिक्षाला रिक्षा टेकते. गाडीला गाडी थडकते. तेव्हा तर तावातावाने हमरी-तुमरीवर येऊन लोकांना आपण भांडताना पाहतो. त्यात आपण निव्वळ प्रवासी असलो, तर मुकाटपणे घडलेल्या प्रसंगाकडे पाहत राहतो; कारण ओ तुम्ही मध्ये बोलू नका हो, असे आपल्यालाही सुनावले जाते. मग कधी एकदा यांची भांडणे आवरतात आणि आपण पुढच्या कामासाठी मोकळे होतो, असे आपल्याला होऊन जाते.
शब्दांनी माणसे जिंकताही येतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात योग्य बदल घडवून आणता येतात. सावरकरांची भेदक नजर, उदंड आत्मविश्वास, जाज्वल्य देशप्रेम कुणाला माहीत नाही? ‘सावरकर, तुम्हे पचास साल की सजा हुई हैं, तुम्हे पता हैं क्या?’ असे ब्रिटिश अधिकाऱ्याने विचारल्यावर ‘आपकी सरकार तब तक रहेगी क्या?’ असे तितक्याच धीटपणे विचारलेली ही व्यक्ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर! पायातल्या व हातातल्या बेड्या, साखळदंड, कुपोषण या गोष्टी सावरकरांचे मनोधैर्य व शब्दसामर्थ्य हरवू शकल्या नाहीत आणि त्यांचे हे शब्दं खरे ठरले.
इतिहासातील ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आनंदीबाई पेशवेंमुळे केवढा अनर्थ घडला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे श्री स्वामी समर्थांचे शब्द रंजल्या-गांजलेल्यांना आधार देतात. म्हणूनच शब्दांचे सामर्थ्य जाणा. अनावश्यक शब्द टाळून आपले जीवन सुखकर करा.
-पल्लवी अष्टेकर