
वाडा: शासनाने ड्रोनद्वारे अत्याधुनिक पद्धतीने कीटकनाशक फवारणी करण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर हे फवारणी ड्रोन मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे.
ड्रोनद्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला तसेच विषबाधेचा कोणताही धोका उद्भवत नाही. सध्या ड्रोनच्या किमती खूप आहेत, त्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकऱ्यांनी त्याचा वापर कसा करायचा? त्याची नियमावलीदेखील ठरविली जात आहे. शेतकऱ्यांना पाच लाखांचा ड्रोन खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारकडून सबसीडीही देण्यात येत आहे.
कोणाला घेता येणार ड्रोन?
दहावी पास, फिटनेस प्रमाणपत्र, आधार कार्ड व पासपोर्ट असणाऱ्यांना हे ड्रोन घेता येणार आहे. शासनाने ड्रोनद्वारे फवारणी करण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना यासाठी अनुदान मिळणार आहे. ड्रोनद्वारे फवारणीमुळे वेळेची बचत होणार असून, विषबाधेचा धोका टळणार आहे. ड्रोन उडविण्याबाबत प्रशिक्षणही दिले जाणार आहे़ याचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
पाणी, औषधांचीही बचत?
शेतात हाताने कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी पाण्याचा आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, यात अपव्य अधिक होतो़ मात्र, ड्रोनद्वारे फवारणी केल्यास पाणी आणि औषधांची बचत होणार आहे.