जीवनामध्ये केव्हा ना केव्हा कोणत्याही वयामध्ये माणसांना प्रेम होतं किंवा माणसं प्रेमात पडतात. प्रेमाने जग जिंकता येतो. तसंच प्रेमामुळे लोकांची आयुष्य बरबाद होतात. प्रेम हे असं आहे की, त्याला जाती, धर्म, वय, या गोष्टी समजतच नाहीत. त्या पलीकडे हे प्रेम असतं. प्रेमात पडलेल्या युवकांचं जग हे वेगळंच असतं.
आदिवासी पाड्यामधील ही घटना. आदिवासी पाड्यात राहणारी तारा ही १८ वर्षांची. नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जायला लागलेली तरुणी, आदिवासी पाड्यांमध्ये कॉलेजला जाणाऱ्या तरुणी म्हणजे फार मोठे दिव्य करणाऱ्या तरुणी म्हणून ओळखले जातात. कारण या समाजामध्ये किंवा हा समाज शिक्षणापासून फार दूर राहिलेला समाज आहे. त्यामुळे या समाजाला शिक्षण म्हणजे फार मोठी गोष्ट अशी वाटते आणि शिक्षण घेणारी मुलं ही त्यांच्यासाठी अप्रूप असतात. त्यामुळे ताराच्या आई-वडिलांना ताराचा फार मोठा अभिमान होता. आपली मुलगी शिकते त्यामुळे आपल्या घरची परिस्थिती बदलेल आणि आपलं कुठे नाव मोठं करेल, अशी अपेक्षा ते तारा करून ठेवत होते. कॉलेजला येता-जाताना बाजूच्या पाड्यातील अर्जुन या युवकाशी ताराची जुजबी ओळख झाली. त्यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री झाली व नंतर त्यांच्यामध्ये जवळीक वाढवून तारा आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडले. अर्जुन हा तारापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. त्याचं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले नव्हतं व शिवाय तो आजूबाजूच्या पाड्यांमध्ये टपोरी व गावगुंडासारखा वावरत असायचा. त्यामुळे पाण्यामध्ये तो गुंड अशीच त्याची ओळख झालेली होती आणि हळूहळू ताराच्या घरातील लोकांना तारा आणि अर्जुनच्या प्रेमाची चाहूल लागली. त्यामुळे ताराच्या घरातील लोकांना या प्रेमाला विरोध केला. करण अर्जुन हा कमी शिकलेला, त्याचप्रमाणे काही काम-धंदा न करणारा, दिवसभर उनाडगे करणारा मुलगा होता. त्याच्यामुळे आपल्या मुलीला तो योग्य नाही, असं ताराच्या आई-वडिलांना वाटत होतं आणि अर्जुनच्या आई-वडिलांना असं वाटत होतं की, ताराही कॉलेजला जाणारी मुलगी आहे त्यामुळे ती उद्धट असणार, पुढारलेल्या विचाराची असणार. त्यामुळे असली मुलगी आपल्या मुलाला नको. त्यामुळे तारा आणि अर्जुनच्या संबंधांना दोन्ही घराचा कडाडून विरोध होता. ताराच्या आई-वडिलांनी ताराला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तू हुशार मुलगी आहेस, आपल्या समाजातली पहिलीच मुलगी कॉलेजला जाणारी आहेस. त्यामुळे तुझ्यासाठी याच्यापेक्षा चांगला मुलगा आपल्या पाड्यांमध्ये मिळेल व तुझं लग्नाचं वयही नाहीये व अर्जुनसोबत लग्न केलंस, तर तुझा आयुष्याचा भविष्य हे शून्य आहे अशा प्रकारे तिच्या पालकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
अर्जुनने तारासोबत लग्नाचा विचार केला. पण ताराचं वय लग्नाच्या वयाला कमी पडत होतं. त्याच्यामुळे जर लग्न केलं, तर अर्जुनला तुरुंगात जावं लागेल, याची कल्पना होती आणि दोन्ही घरातील लोक त्या दोघांना भेटायला देत नव्हते. ताराचे वडील ताराला कॉलेजला सोडायला आणि आणायला येत होते. त्यामुळे त्या दोघांची भेट होत नव्हती. ताराकडील मोबाइल तिच्या आईकडे होता. त्यामुळे अर्जुनला नेमकं काय करायचं, हे समजत नव्हतं. ताराच्या घरातील लोक ताराला हर प्रकारे समजावत होते की, तुला चांगला मुलगा बघून देतो. पण तू एका गावगुंडाशी लग्न करू नकोस. पण तारा आपल्या निर्णयावर ठाम होती.
तारा गेले अनेक दिवस आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली येत-जात होती. त्यामुळे तिला आपण घरातच जेलबंद झाल्यासारखं वाटत होतं. काहीतरी करून या गोष्टींपासून आपली सुटका करून घ्यायला हवी. म्हणून तिने आपल्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन माझा आणि अर्जुनचा याच्यापुढे काही संबंध नसणार नाही, असं सांगितलं. आपल्या मुलीवर विश्वास ठेवून. आपल्या मुलीचा भविष्याचा विचार करून घरामध्ये पहिल्यासारखं वातावरण निर्माण झालं. काही दिवस निघून गेल्यावर ताराने आईला मी रानात लाकडे आणायला जाते म्हणून सांगितलं आणि ती घरातून निघाली. दोन तासांनी ताराने आईला फोन केला आणि मी आत्महत्या करत आहे, असं सांगितलं आणि फोन ठेवून दिला. ही गोष्ट वाऱ्यासारखी तारा राहत असलेल्या पाड्यात पसरली आणि पाड्यातील सर्व लोक जंगलाच्या दिशेने धावले. सगळं जंगल पालथे घातल्यावर त्यांना तारा आणि अर्जुन यांचे देह निश्चित पडल्याचे आढळले. रानातून दवाखान्यात येईपर्यंत तारा आणि अर्जुन यांचा जीव गेलेला होता. त्या दोघांनी गवतावर मारले जाणारे औषध प्राशन केले होते. त्यांना शोधेपर्यंत आणि डॉक्टरकडे नेईपर्यंत जो वेळ गेला त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला.
ताराने आपल्या घरातील लोकांना फसवले होते की अर्जुनशी काही संबंध नाही, असे सांगून तिने पूर्वीसारखं वातावरण निर्माण केलं व योग्य वेळ मिळेल तेव्हा अर्जुनसह पळून जायचं, असं तिने ठरवलेलं होतं. पण सरकारने वाढवलेली लग्नाचे वय यात ती बसत नव्हती. त्याच्यामुळे दोघांना कोणताच मार्ग सापडत नव्हता आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
दोन्ही घरातील लोकांचा लग्नाला विरोध होतोय म्हणून दोघांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पण आत्महत्या करून त्यांना खरंच आपलं प्रेम मिळालं का. उलट ताराच्या घरातील लोक स्वप्न बघत होते की, आपली मुलगी शिकेल आणि आपली परिस्थिती बदलेल. आपलं नाव मोठं करेल ही अपेक्षा ताराच्या घरातली लोकं ठेवत होते. तो अपेक्षाभंग ताराने केला होता. नाव मोठं केलं होतं, पण ते आत्महत्या करून तिने आपलं नाव मोठं केलं.
तरुण पिढी करिअरचा विचार न करता बालवयात प्रेमात पडतात आणि नको त्या मार्गाने भरकटत जातात. काही लोक आत्महत्या करून आपले आयुष्य संपवतात, तर काही पळून जाऊन लग्न करतात आणि नंतर पश्चाताप करतात. प्रेम आहे की आकर्षण आहे? हेच त्यांना समजत नाही. अशी पिढी भरकटत चाललेली दिसून येत आहे.
(सत्य घटनेवर आधारित)
-अॅड. रिया करंजकर