मोजावे वाळवंटाच्या दक्षिणेकडील काठांवर वाढलेला १२ वर्षांचा मुलगा, क्वचित बस चुकल्यावर शाळेत जाण्यासाठी दहा मैलांचा प्रवास करत असतानाच धावण्याच्या प्रेमात पडला. लॅास एन्जेलिस स्थायिक धावपटू ‘रिओ लेकशोर.’ एक शांत लक्षपूर्वक धावण्याची दिनचर्या. दररोज किमान १० मिनिटे असे दोन आठवडे धावण्याच्या उद्दिष्टाने धावायला सुरुवात केली आणि आज ती संस्मरणीय कामगिरी ठरली. आजही दररोज धावणे हा त्यांच्या उद्दिष्टाचा एक बेंचमार्क ठरला.
स्पेन तरुणी कॅरोलिना, दुर्दैवाने आई आणि लग्न संपल्यानंतर स्वतःवरचा, स्वतःच्या आयुष्यावरचा राग दूर करण्यासाठी ट्रेडमेलवर स्वतःलाच आव्हान देत होती. प्रशिक्षकांच्या साथीने कठीण काळ जाताच २१ किमी धावून तो विजय आईला समर्पित केला. धावताना अडचणी खूप आल्या. कॅरोलिना म्हणते कधीही धीर सोडू नका, आपले धैय विसरू नका. स्वतःला आव्हान देण्याचा उत्तम मार्ग; धावणे!
मॅरेथॉनमध्ये हजारो माणसे धावतात. प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे. एकाला आपली क्षमता आजमावून पाहायची होती, दुसऱ्याला स्वतःचाच आधीचा विक्रम मोडायचा होता. तिसऱ्याला मॅरेथॉनचा अनुभव घ्यायचा होता, चौथा टी-शर्ट आणि मित्रांसोबत आनंदासाठी. काही आजारांवर, व्यसनावर, ताणावर मात करण्यासाठी, तर काही फिटनेससाठी मॅरेथॉनमध्ये भाग घेतात.
१. स्नायूला दोन वेळा दुखापत होऊनही ऑपरेशन झाल्यानंतर कालांतराने चार पाच मॅरेथॉन पूर्ण करणारे दीक्षित, २. ‘तू जिंदगी में कभी दौड नहीं पाएगा, कमसे कम थोडा चालना तो सिखो’ मित्राचे हे शब्द ऐषोरामी जीवन जगणाऱ्या सतीश गुजराल यांना लागले. त्यानंतर सलग पाच वर्षे दक्षिण आफ्रिकेतील अनेक मॅरेथॉन रनरचे मानाचे तुरे त्यांनी मिळविले. पळण्यासारखा दुसरा व्यायाम नाही आणि आनंदही नाही.
मॅरेथॉनमध्ये धावण्याआधी प्रत्येकाला आपण का धावत आहोत? त्यामागचे उद्दिष्ट स्पष्टपणे माहीत असणे आवश्यक आहे. तुमचे उद्दिष्ट तुम्हाला पुढे नेणारे हवे. जेव्हा निराशेने जगणे अपरिहार्य होते, तेव्हा मॅरेथॉनचा विचार करा. मॅरेथॉन शारीरिक आहे तरी त्यासाठी मानसिक दृढता हवी. मॅरेथॉनने शारीरिक आरोग्य चांगले राहते. प्रशिक्षणाशिवाय मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ नये.
मॅरेथॉन! लांब पल्ल्याची प्रमुख रस्त्यावरून लोकांसमावेत एकत्र धावण्याची शर्यत! जानेवारीतील दुसरा रविवार. या वर्षी १५ जानेवारीला १८व्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ५५००० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी. सर्वांचे अभिनंदन! टाटा मुंबई मॅरेथॉन जनतेच्या आरोग्याचा विचार करते. मॅरेथॉनमध्ये स्पर्धेची विभागणी असल्याने आपल्या कुवतीनुसार सामान्य जनतेसह अनेक नामवंत, भारतीय धावपटू गोपी, श्रीनू, सुधा सिंग सह अनेक हजेरी लावतात.
प्राचीन काळी ग्रीस देशांत मॅरेथॉन गावी पर्शियनसोबत झालेल्या लढाईत ग्रीक जिंकले. मॅरेथॉन विजयाची बातमी सांगण्यासाठी अंगावरच्या शस्त्रासहित एक सैनिक तिथपासून अथेन्सपर्यंत रस्त्यावरून धावत गेला. त्या सैनिकाने रस्त्यावरचे कापलेले तेच अंतर ४२.१९५ किमी होते. तेच अंतर अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. गावाचे मॅरेथॉन हे नाव स्पर्धेचे झाले. दुर्दैवाने दमल्याने त्या सैनिकाचा अंत झाला. भारतात अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा होतात.
मुंबई मॅरेथॉन चॅम्पियन रायबरेली एक्स्प्रेस सुधा सिंगला अभ्यासापेक्षा लहानपणापासून खेळाची आवड. ट्यूशनला न जाता ट्रॅकवर, एक्स्प्रेस ट्रेनच्या बाजूनेही ती धावत होती. तिच्या वडिलांना समजताच त्यांनी तिला ट्रेनिंगला पाठविले.
एक दिवस मार्निंग वॉकच्या वेळी लोकांना धावताना पाहिले. शाळा सोडल्यावर ३० वर्षांनी आपण पळू शकू का? मन स्वस्थ बसेना. ठाणे मरेथॉन, काही वर्षांनी मुंबई टाटांची पूर्ण मॅरेथॉन प्रशिक्षण घेऊन अंजली कुलकर्णीने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
मॅरेथॉनमध्ये दीर्घकाळ धावण्याची क्षमता हवी. म्हणून वेगाने न धावता संपूर्ण शर्यत समान गतीने म्हणजेच वेग नेमका ठेवून शेवटपर्यंत थकवा न येता धावणे (समपेसिंग) योग्य. त्यासाठी दररोज सराव हवा. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी स्टॅमिना, जिद्द, समर्पण हवे. मुख्यतः अंतिम रेषा जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत धावतच राहा. धावताना अनेक अडचणीही येतात. धावणे सोडून द्यावे, पाठी फिरावे, थांबावे असे वाटते; परंतु रेंगाळा, पण न थांबता चालत राहा नि अंतिम रेषा गाठा.
पोलिओची लस वेळेवर न दिल्या गेल्यामुळे पोलिओग्रस्त झालेल्या मुलाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘मॅरेथॉन जिंदगी!’ वडिलांच्या प्रेरणेने अपंगत्वार मात करीत मुलाने यशाचे शिखर गाठले. दिव्यांगाची संघटना सुरू केली असा हा दिव्यांगाच्या संघर्षावरचा चित्रपट. समाजात बरेचजण मानसिक अपंग असल्याने त्यांचे आयुष्य अशांततेत चालू राहते. त्यांनी हा चित्रपट पाहावा.
‘जीवन एक मॅरेथॉन आहे स्प्रिंट नाही’ स्प्रिंटमध्ये अल्पावधीवर लक्ष केंद्रित करून वेगाने धावतो. घाईत चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मॅरेथॉनमध्ये दूरच्या पल्ल्यावर लक्ष केंद्रित करून धीराने, धीम्या गतीने धावून पाठलाग चालू ठेवायचा… लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मंद गती. ससा कासव शर्यत. समस्यांचे मूळ तणावात असते. शांत राहा. आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टीचा सखोलपणे विचार करून निर्णय घ्या. धावण्याचा आनंद घेत वाटेतले छोटे-छोटे यश साजरे करा. जीवनाप्रमाणे मॅरेथॉनमध्येही लांबचे अंतर पार करताना, काही कालावधी खूप कठीण, तर काही खूप सोपा जातो. येणाऱ्या चढउताराच्या वेळी धावताना मार्गातले अडथळे जाणून, चालण्याचा वेग नियंत्रित करता आला पाहिजे. तुमचा प्रशिक्षणावर विश्वास हवा. ‘अंतिम रेषा हेच धेय. जो अंतिम रेषा पार करतो, तो विजयी.’ येथे नंबर नाही. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे, उद्दिष्ट्य वेगळे, त्यामुळे सारेच यशस्वी. जीवन जगण्याचा महत्त्वाचा धडा मॅरेथॉनचे प्रशिक्षण देते. मॅरेथानमध्ये भाग घेतल्यावर आपल्या जीवनात बदल घडून येतो.
साधारणपणे टाटा मुंबई मॅरेथॉनची आखणी समुद्रालगतच्या मार्गाने असते. समुद्रासोबत रस्त्याच्या कडेला उस्फूर्तपणे स्पर्धकांना चिअरअप करणारे मुंबईकर. तो आनंद मीही घेतला आहे. लहान, तरुण मुलापासून ज्येष्ठ नागरिक, व्हीलचेअरवरील अपंग, हातात बॅनर्स, साऱ्यांचा उत्साह पाहून पुढच्या वर्षी अनेकजण सहभागी होतात. माझ्या आजच्या लेखाचा हाच उद्देश, आनंदासाठी, तंदुरुस्तीसाठी मॅरेथॉनमध्ये भाग घ्या.
-मृणालिनी कुलकर्णी