मुंबई: रविवारी मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे हिंदू संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला. राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
दादर शिवाजी पार्क ते कामगार स्टेडियम असा हा विराट मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखाहून अधिक हिंदू समाजातील लोकांना एकत्र आणण्याची तयारी हिंदू संघटनांनी केली असल्याचे समजते. विश्व हिंदू परिषदेसह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच इतर हिंदू संघटनाही या मोर्चात सामील झाल्या होत्या. या संघटना गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी करत आहेत.
या मागण्यांसाठी आंदोलन
गेल्या २ महिन्यात महाराष्ट्रात ४० हून अधिक हिंदू जनक्रोश मोर्चे निघाले, पण आजचा मोर्चा खूप मोठा असल्याचे सांगण्यात येतेय. महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करावा, अशी या संघटनांची मागणी आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे. अवैध इस्लामिक धार्मिक स्थळांवर कारवाई करावी. लँड जिहादवर कारवाई झाली पाहिजे, अशाही मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात आल्या.