जगदिशच्या मित्राने त्याला आज खास आमंत्रण देऊन घरी जेवायला बोलावलेलं. यामागे काहीतरी खास कारण होतं. जगदिशने आपल्या पत्नीलाही बरोबर घेतलेले. मित्राच्या घरापाशी येताच जगदिशच्या पत्नीचे डोळे अगदी दीपून गेले. ती त्याचा बंगला पाहतच राहिली. म्हणाली, ‘अहो, तुमचा हा मित्र तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे ना पक्षाचा? मग तो बंगल्यात राहतो आणि तुम्ही इतकी वर्ष कार्यकर्ता म्हणून वावरताय. पण आपलं घर मात्र अजून कौलारूच आहे.’
‘अगं गप, कुणी ऐकेल.’
‘ऐकू दे, इतकी वर्ष तुम्ही कार्यकर्ता म्हणून मिरवताय, पण काय पदरात पडलं? हे असं लाचारासारखं मागे मागे फिरायचं सगळ्यांच्या’
‘मग काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?’
‘कधी निवडणुकीला उभे राहिले का?’
‘नाही राहिलो, पण आता राहणार आहे.’
‘काय?’ पत्नी विस्मयचकित.
‘मित्राने त्याच्यासाठीच बोलावलं आहे जेवायला घरी. कळेलच तुला आम्ही काय बोलतो ते आज.’ त्याचं बोलणं ऐकून त्याची पत्नी भारावूनच गेली.
ती झपझप पुढे सरसावली. या कार्यकर्त्याचा आता तिला फार अभिमान वाटून गेला. ती मनोमन खूश झाली. जगदिशच्या मित्राने त्या दोघांचंही चांगलं स्वागत केलं. आज खास जेवणाचा बेत आखलेला म्हणून विविध पदार्थांची रेलचेल पाहता अशी तजवीज आजवर कुणी केली नव्हती. जगदिशची पत्नी सुखावली. जेवण झाल्यावर हसत हसत म्हणाली,
‘भावोजी, तुम्ही आमच्या यांना आता मंत्री बनवायचं मनावर घ्या. यावेळचं तिकीट यांना द्यायचं बघा.’
मित्र हसला, म्हणाला, ‘वहिनी, कार्यकर्ता बनणं फार सोपं असतं. पण त्याचा मंत्री बनवायचा असेल, तर राजकारणात खऱ्या अर्थाने शिरावं लागतं.’
‘अहो, मग हे आहेतच की राजकारणात.’
‘तसं नव्हे वहिनी, तुम्हाला नाही कळणार, तुम्ही जरा बाहेर बसा, आम्ही फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत.’ जगदिशची पत्नी मग बाहेर थांबली. मग जगदिश आणि मित्र आतील रूममध्ये दरवाजा बंद करून महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू लागले.
ती जरा अस्वस्थ झाली. तिचे लक्ष आणि कान आतमध्ये काय चाललंय याकडे लागून राहिले.
मित्र जगदिशला म्हणाला, ‘यावेळी तू थांब जरा, मला तिकीट हवं आहे.’
‘अरे पण, माझं बोलणही झालं आहे वरपर्यंत.’
जगदिश म्हणाला.
‘म्हणूनच सांगतो, तू जरा थांब, यावेळी मला संधी दे.’ मित्र बोलला.
‘अरे’ मी इतकी वर्ष पक्षासाठी झटतोय, तुझ्या आधीपासून मी आहे या पक्षात आणि तू तर आता येऊन… पण,’
‘अरे यार मग बस्स झालं ना, तुला सत्तेची लालसा नाही, तर तू कशाला धडपडतो आहेस तिकिटासाठी?’
मित्र म्हणाला.
‘माझ्या पत्नीसाठी. तिला पाहायचे आहे मला निवडून आलेले.’ जगदिश बोलला, तसा मित्र हसला.
‘वेडा आहेस का तू, पत्नीसाठी निवडणुकीला उभा राहणार तू? अरे मग लोकांचं काय? राजकारण म्हणजे खेळ वाटला का तुला? एरव्ही तू सगळ्यांच्या मागे मागे करत असतोस, काय मिळालं तुला? साधं घर तरी बांधलंस का नवं ? माझा बंगला वघ.’ मित्र ओरडलाच.
‘अरे. हळू बोल. बाहेर माझी पत्नी ऐकेल. तू आज आम्हाला सन्मानाने जेवायला बोलावलंस. वाटलं मला संधी देशील निवडणुकीला उभं राहण्याची. पण नाही, तू तुझा हेतू साध्य करण्यासाठी मला मनवण्यासाठी
जेवायला बोलावलंस.’
‘ ते तू काही समज, माझं ऐकण्यात शहाणपण मान, तू कार्यकर्ता म्हणूनच शोभून दिसतोस अरे. मला यावेळी
संधी दे.’
‘ते माझ्या हातात नाही. अरे, उद्या मंत्री येतील, त्यांच्याशी जे बोलणं होईल, त्यावरच अवलंबून आहे.’
ते मग निराश मनाने बाहेर आले. त्यांचा चेहरा बघून पत्नी धीरगंभीर.
काय झालं? म्हणून तिने विचारलं नाही. जे समजायचं ते ती समजून गेली. जगदीशला धीर देत म्हणाली, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही खरे कार्यकर्ता आहात. आजवर तुम्ही पक्षासाठी जे केलं ते वाया जाणार नाही. उद्या मंत्री येतील ते तुमच्या चांगले परिचयचे आहेत. त्याच्याशी बोलून ठरवा काय ते…
पत्नीचं बोलणं त्यांना पटलं बहुतांशी… त्यांनी मान डोलावली नि ते निराश मनाने तिथून पत्नीसह घरी निघून आले. तो दिवस तसाच गेला. अखंड विचारात.
दुसऱ्या दिवशी मात्र ते आणि पत्नी मंत्री येण्याच्या ठिकाणी पोहोचले. तोवर मित्रही आलेला. केव्हाही मंत्री महोदयांची गाडी येईल आणि ते निघूनही जातील, तर आताच त्यांना भेटून काही बोलून घेऊ या उद्देशाने जगदिश आणि त्याची पत्नी सगळ्यांच्या पुढेच उभे राहिलेले. पोलीस त्यांच्या पुढे…
काही क्षणातच मंत्री आले गर्दी वाढली… पोलिसांनी सगळ्यांना पांगवले. पण जगदिश मात्र पुढेच राहिलेला. कुणीही पुढे जाऊ नका, असे सांगूनही जगदिश सारं काही विसरून पुढे धावलाच. मंत्री गाडीतून खाली उतरणार तोवर जगदिशने त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि तो पुढेच उभा राहिला.
‘अरे ए, हो बाजूला, तुला कळतं का काही?’ म्हणून कुणीतरी त्याला एका हाताने खेचलं आणि मागे ढकलून दिलं. मंत्री गाडीतून खाली उतरले, त्यांनी सगळ्यांना हात जोडले, हात उंचावले… मात्र जगदिश मात्र कुठच्या कुठे भिरकावला गेल्यामुळे त्या गर्दीत तो अक्षरश: तुडवला गेला. त्याची पत्नी कासाविस होऊन त्याच्यापाशी धावली. मंत्र्यांच्या आगमनाने उसळलेली गर्दी, उडालेला धुरळा आणि क्षणातच मंत्री येऊन आल्या पावली निघूनही गेल्याची जाणीव यावेळी जगदिशच्या पत्नीला राजकारणाचा नवा धडा शिकविणारी ठरली. जगदिशच्या डोक्याला झालेली जखम, पाण्यासाठी चाललेली तगमग पाहता, निवडणुकीचं तिकीट राहिलं बाजूला राजकारणातल्या या कार्यकर्त्याला माणुसकीही कुणी दाखवली नाही, हे पाहून जगदिशचे डोळे पाण्याने भरलेच. मात्र त्याची पत्नीही वास्तवाचं नवं रूप नजरेत भरून राहिली. यावेळी राजकारणातला कार्यकर्ता नव्हे आपलं कुंकू कसं जपलं जाईल, याचा विचार करून तिने जगदिशला मिळेल त्या रिक्षात घातलं आणि थेट दवाखाना गाठला.
-प्रियानी पाटील