एक चमत्कार होता. त्यांनी जे जे लिहिले ते अद्वितीयच! सिनेगीते, कोळीगीते भक्तिगीते, भावगीते, देशभक्तीपर गीते, जेवढी शांताबाईनी लिहिली आणि ज्या दर्जाची लिहिली तितकी क्वचितच कुणी लिहिली असतील! याशिवाय कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य अशा प्रकारातील त्यांची किमान १०० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी आळंदी येथे भरलेल्या ६९व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही १९९६ मध्ये भूषविले होते.
अस्सल गावरान भाषेत लावण्या लिहिणाऱ्या शांताबाईंनी संस्कृतमध्ये नुसते एम. ए. केले नाही, तर त्यांना या परीक्षेत तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले होते. एम. ए. झाल्यावर त्यांनी काही दिवस पत्रकारिताही केली होती. तीही कुठे, तर लोकप्रिय संपादक आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठात! पुढे या विदुषीने नागपूरच्या प्रसिद्ध हिस्लॉप कॉलेजमध्ये मराठी अध्यापनाचे काम केले. काही काळ त्या मुंबईच्या रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.
ज्याकाळी प्रत्येक मराठी सिनेमा ही एक दर्जेदार कलाकृती असायचा त्या कृष्णधवल सिनेमाच्या काळात अनेक भावमधुर गीतांची रत्ने शांताबाईनी रसिकांना भेट दिली.
‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारखी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई – या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत! मराठीच्या सर्व बोलींवर त्यांची हुकूमत चालायची. ग्रामीण बाजाची अस्सल मराठी, संगीत नाटकातली संस्कृतप्रचुर अभिजात मराठी, भावगीतातली भावूक बोली, लावणीतली ठसकेबाज मराठी अशी मायबोलीची सर्व रूपे शांताबाईसमोर हात जोडून उभी असत. शांताबाई ज्या दिवशी जी निवडतील तीच त्यांची खरी बोली आहे असे वाटत राही.
‘हे बंध रेशमाचे’मधील ‘काटा रुते कुणाला’ यासारखे नाट्यगीत, ‘मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’, ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ सारखी गोड कोळीगीते, ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’, ‘जय शारदे, वागेश्वरी’, ‘मागे उभा मंगेश’, ‘गणराज रंगी नाचतो’, सारखी अगणित भक्तिगीते, ‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’, ‘जाईन विचारीत रानफुला’, ‘ही वाट दूर जाते’ सारखी भावगीते, ‘जे वेड मजला लागले’, ‘दाटून कंठ येतो’, ‘दिसते मजला सुखचित्र नवे’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘माझी न मी राहिले’, ‘आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे’सारखी कमालीची लोकप्रिय
सिनेगीते शांताबाईंशिवाय कोण लिहिणार होते?
असेच शांताबाईंचे काहीसे गूढ वाटणारे एक भावगीत आहे. आशाताईंनी गायलेल्या या भावगीतात पंडित हृदयनाथ यांनी मूळ कवितेचे भाव अधिकच आर्त करून टाकले आहेत. त्यासाठी त्यांनी पुरिया धनश्री आणि श्रीगौरी रागाचा उपयोग केला.
तसे ते एका विरहिणीचे प्रेमगीत वाटू शकते. तशीच ती कृष्णभक्तीत लीन झालेल्या मीराबाईची विरहिणीसुद्धा ठरेल. समीक्षक तर इतरही अनेक अर्थ काढू शकतील –
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे,
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे…
प्रियतमाच्या भेटीची ओढ हाच या कवितेचा विषय. ही ओढ मात्र खूप आंतरिक आहे. वाळवंटातून चालताना जीवघेणी तहान लागावी तितकी ती आर्त आहे. प्रेयसी ‘त्याला’ भेटायला निघाली आहे. आता तिचे घर, गाव खूप दूर मागे राहून गेले आहे. त्याच्या गावाचे नामोनिशाण कुठे दिसत नाही, अशी विमनस्क अवस्था आहे. त्यात कितीतरी गोष्टींचे माथ्यावरचे अनामिक ओझे आता खूप जड वाटू लागले आहे. एका सगळीकडून घेरून येणाऱ्या अगतिकतेने मनाचा ताबा
घेतला आहे.
हे गाणे ऐकताना रसिक नकळत या गीताच्या भावनेशी समरस होतो. त्यालाही हे ओझे जाणवू लागते. श्रोता स्त्री असो की पुरुष, गीतातील भावनेशी समरस होऊन जातो. त्यालाही त्याने आजवर भोगलेल्या सुखादुखाचे ओझे, ताणतणाव, जबाबदाऱ्या, चिंता, काळज्या, थकलेल्या भावभावना असह्य होतात. सगळी निराधारता, अगतिकता मनाला घेरून टाकते आणि मग ‘वरच्याच्या’ आश्रयाची गरज तीव्रतेने
जाणवू लागते.
किर्र बोलते घन वनराई,
सांज सभोती दाटून येई…
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे…
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे…
शांताबाई किती कमी शब्दांत केवढे मोठे चित्र उभे करतात, ते पाहून थक्क व्हायला होते. गीतातील प्रियेचा रस्ता तर प्रतीकात्मक आहे. मनात भय उत्पन्न करणाऱ्या जीवनाच्या निबिड अरण्यातील प्रवासाचे वर्णन त्या ‘किर्र वनराई’ असे करतात. त्यात एकटेपणा अजूनच गर्द करणारी कातरवेळ…
आजवर अनुभवलेल्या सुखाची माया आता संपत आली आहे. जीवनवृक्षाच्या एकेकाळच्या हिरव्यागार पानाचा केवळ पाचोळा होऊन पडला आहे आणि प्रत्येक पावलागणिक तो पायाखाली चुरला जातो आहे, वाजतो आहे. कसली ही अवस्था! पुढे काही भविष्य नाही, मागे जायची सोय नाही. मागचे सगळे दरवाजे बंद झाले
आहेत. एखाद्या भयंकर स्वप्नात होते, तशी
हतबल अवस्था-
गाव मागचा मागे पडला,
पायतळी पथ तिमिरे बुडला,
ही घटकेची सुटे सराई,
मिटले दरवाजे… जिवलगा…
शेवटी तर गाण्यातील विरहिणीच्या मनातील आर्त हुंदका जणू प्रार्थना बनून जातो. शांताबाईनी सुरवातीला योजलेले प्रियकर प्रेयसीचे प्रतिक आता धूसर, अंधुक, जवळजवळ दिसेनासे होऊन जाते. उरते ती फक्त टोकाची अगतिकता आणि सुटकेची एक अनावर इच्छा! एका श्रांत, अस्वस्थ आत्म्याला लागलेली परमात्म्याच्या भेटीची ओढ! हाच कवितेचा खरा विषय आहे, हे लक्षात येऊ लागते.
निराधार मी मी वनवासी,
घेशिल केव्हा मज हृदयासी…
तूच एकला नाथ अनाथा,
महिमा तव गाजे….
भूतकाळ सरला. घर, गाव सुटले, कुणाची साथ नाही. अशा वेळी परमेश्वर हाच एकमेव आधार वाटू लागतो. ‘अनाथांचा नाथ’ अशी त्याची कीर्ती आहे. म्हणून मग सगळा संकोच सोडून शरणागत भक्ताच्या भूमिकेत जाऊन शांताबाई मीरेसारख्या त्याची प्रार्थना करू लागतात!
केवढा मोठा आशय हे जुने कवी ‘ब्लूटूथ’सारखा आपल्या मनात सहजतेने हलवितात ना! म्हणून तर मागचा दरवाजा उघडून मागे जायचे. त्यांच्या सात्त्विक सहवासात चार क्षण घालवायचे.
-श्रीनिवास बेलसरे