हॅलो, सर नमस्कार, आपका इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटी हो गयी हैं। अगर आपकी पॉलिसी सरेंडर करेंगे तो पॉलिसी के ७ कोटी ७० लाख रुपये आपके खाते में आ जायेंगे।’ घाटकोपर येथील ड्रायफ्रुटचे होलसेल व्यापारी शाह (नाव बदलेले) यांना इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून आलेला हा पहिला फोन. त्यानंतर ईमेल आयडीवरून काही कागदपत्रे मागविण्यात आली. व्यापारी शाह हे आपल्या कामात व्यस्त असल्याने, इन्शुरन्स कंपनीमधून आलेले फोन आणि ईमेल हे खात्रीपूर्वक पाहण्यासाठी त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्यांवर जबाबदारीही सोपविली होती. इन्शुरन्स कंपनीकडून पुन्हा फोन आला होता. पॉलिसीची रक्कम मोठी असल्याने ती सरेंडर करण्यासाठी ४ कोटींपेक्षा अधिक रक्कम आपल्या खात्यावर जमा आहे, हे आम्हाला दाखवायचे आहे, असे शाह यांना सांगण्यात आले. त्यासाठी विविध कारणे सांगून अनेक बँकेत पैसे भरण्यास सांगितले. शाह यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रिसिप्ट, रिझर्व्ह बँकेचे पत्र, नॅशनल पेमेन्ट कार्पोरेशन ऑफ इंडीयाचे पत्र तसेच मिनीस्टर ऑफ फायनान्सचे सही शिक्क्यानिशीची काही कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवली. यावर विश्वास ठेवून शाह यांनी एकूण ४ कोटी ३९ लाख ५७ हजार ५३२ एवढी मोठी रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यावर जमा केली. मात्र पॉलिसी मॅच्युरिटीचा धनादेश आज ना उद्या मिळेल, या आशेवर एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटून गेला होता. शाह यांना अद्याप रक्कम मिळाली नव्हती. ज्या मोबाइलवरून संपर्क साधला जात होता. ते फोन स्वीच ऑफ दाखवत होते. त्यामुळे शाह हे तणावाखाली आले. सर्व पर्याय संपल्यानंतर त्यांनी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. सदर गुन्हयाच्या तपासात विविध राज्यांतील एकूण २७ बँक खात्यात व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये हैद्राबाद येथील बँकेतील खात्यामध्ये या गुन्हयातील एकुण ७१ लाख रुपये इन्श्युरन्स पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या नावाखाली घेण्यात आल्याची माहिती पुढे आली. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणारा आरोपी अनुजकुमार सहा ( वय २१ वर्ष ) हा लाभधारक बँक खातेधारक असल्याचे समजताच त्याला या गुन्ह्यात पहिली अटक करून पोलिसांनी तपासाला वेग दिला. अनुजकुमारचे नोएडा, उत्तर प्रदेश येथे मोबाइल शॉपीचे दुकान आहे. तो इन्श्युरन्स पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीशी संगनमत करून फसवणूक केलेली रक्कम स्वत:च्या खात्यामध्ये घेत असे. त्यानंतर नोएडा परिसरातील विविध बँकांच्या एटीएमद्वारे तो पैसे विथड्रॉव्हल करत असे. तसेच विविध बँकांमध्ये मनी ट्रान्सफरद्वारे वळती करून शाह यांच्यासारख्या व्यक्तींकडून आलेली रक्कम संगनमताने वाटून टाकत असे. त्यानंतर गाझियाबादमधील संदीपकुमार लालताप्रसाद याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. संदीपकुमार हा गुन्ह्यातील बँकखाते आरोपींना वापर करण्यास देत असे. त्याबदल्यात त्याला प्रत्येक बँक खात्यामागे १५ हजार रुपये मिळत होते. अशा प्रकारे संदीपकुमार मागील वर्षभरात २५५ बनावट बँकखाती उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी बँकखाती उघडताना संदीपकुमारने शक्कलही लढवली होती. कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून संबधितांचे बनावट घरभाडे करारपत्र तयार करून घेई, तर कधी आधार कार्डवर पत्ता बदलण्याचे कारण पुढे करीत असे. मोबाइल कंपनीकडून मोबाइल सिमकार्ड घेऊन ऑनलाइन पद्धतीने विविध बँकांमध्ये त्यांचे नावे बँकखाते तो उघडत असे. तसेच एटीएम,डेबीट कार्ड हे कुरिअर कंपनीमार्फत स्वतःकडे घेऊन सदरचे एटीएम डेबीट कार्ड व बँकधारकांचे मोबाइल सिमकार्ड हे नोएडा येथे कॉलसेंटर चालविणारया रविकुमार सरोजसिंह व सुमीत चौधरी यांच्याकडे दिली जात होती. हे दोघे अनेक राज्यांतील व्यक्तींना फोन करून इन्श्युरन्स रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवत होते, तर या टोळीपैकी रविकुमार सरोजसिंह हा इन्श्युरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांचा डेटा गोळा करत असल्याची माहिती सायबर पोलिसांना समजली. गेल्या एक वर्षांच्या कालावधीत अनेक लोकांची फसवणूक करून करोडो रुपयांच्या रकमा काढून त्याची विल्हेवाट लावली होती. या टोळीच्या आमिषाला बळी पडले. त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती.
सायबर पोलिसांच्या आहेत या सूचना :
१. ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य व्यक्तींना विनंती आहे की, अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामटयांपासून सावध रहावे. २. मोबाइल, फोनवरील अनोळखी व्यक्तीला आपला बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड, ओटीपी., केवायसी, डेबीट कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक अशी संवेदनशील माहिती मागत असतील, तर फोन त्वरित कट करून नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. ३. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतेही मोबाइल अॅप डाऊनलोड करू नये तसेच लिंक क्लिक करू नये. ४. कृपया बँक खाती उघडण्यासाठी तुमची कागदपत्रे इतर व्यक्तींस देऊ नयेत, कोणासही तुमचे सिमकार्ड वापरण्याची परवानगी देऊ नये. दुसरा वापरत असलेल्या आपल्या गोष्टी बेकायदेशीर कारणांसाठी वापरल्या जाऊ शकतात.
तात्पर्य : करोडो रुपयांना फसविणारी, उत्तर प्रदेशातील नोएडासारख्या शहरातून ऑपरेट होणारी सक्रीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने अशा गुन्ह्यांचा छडा लागला आहे. त्यामुळे जर परिचित एजंटमार्फत आपण पॉलिसी काढली असेल, तर अनोळखी व्यक्तीवर का भरोसा ठेवायचा? हे ध्यानात असू द्यावे.
-महेश पांचाळ