नाशिक (प्रतिनिधी ): गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरवूनच काम करते आहे. जनता व शेतकरी सुखी व्हावा, हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकमध्ये पाच दिवसांपासून सुरु असलेल्या श्री समर्थ मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.
डोंगरे वस्तीगृहावर पाच दिवस पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देत मुख्यमंत्र्यांनी तेथील स्टॉल धारकांशी हितगुज साधले. कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प. पू. अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे,नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आ. बबन लोणीकर, आ. संजय शिरसाठ, आ. भरत गोगावले, आ. सुहास कांदे, आ. सीमा हिरे, खा. हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे आदी उपस्थित होते.