Monday, May 5, 2025

किलबिल

चाणाक्ष संकेत

चाणाक्ष संकेत

धानोरा नावाचे एक छोटेसे टुमदार गाव होते. पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतांमघ्ये आंब्यांची खूप खूप झाडे असायचीत. अशा खूप आंब्यांच्या झाडांच्या समुदायाला आमराई असे म्हणायचे. धानोरा गावाच्या शेतशिवारांमध्येसुद्धा अशा अनेक आमराया होत्या. वसंत ऋतूत आंब्यांच्या झाडांना खूप मोहर यायचा. त्याच्या सुगंधाने पूर्ण आमराई दरवळून जायची. थोड्या दिवसात छोट्या कैऱ्यांनी आंब्यांची झाडे बहरून जायची. हळूहळू त्या कैऱ्या मोठ्या होऊ लागायच्या. त्या मोठ्या होऊन थोड्या थोड्या पक्व होऊ लागल्या म्हणजे त्यांचे पाड बनायचेत. ह्या आंबटचिंबट कै­ऱ्या व झाडाला पिकलेले रसाळ, गोड-आमखर व हिरवट- पिवळसर पाड खाण्यासाठी, कै­ऱ्या घरी आणून त्यांचा आंबटगोड चवदार आंबरस करून खाण्यासाठी आंबराईत मुलांच्या दररोज न चुकता चकरा व्हायच्यातच.

सहसा ह्या ऋतूत मुलांच्या परीक्षा संपलेल्या असायच्यात. ते आपापल्या घरून बारीक मिठाच्या पुड्या बांधून घ्यायचे. सोबत एखादा छोटासा चाकू किंवा लहानशी सुरी घ्यायचे नि आंबराईत जायचे. तेथे गेल्यानंतर प्रथम झाडाखाली पडलेले पाड गोळा करायचे. मग दगड मारून काही कच्च्या कै­ऱ्या पाडायचे. अशा पाडलेल्या कै­ऱ्या ते कापायचे. त्यांच्या कापांना मीठ लावायचे व मस्तपैकी एकमेकांच्या तोंडांना पाणी सोडीत मिटक्या मारीत खायचे. नंतर मस्तपैकी पिकलेले आमखर-गोड पाड खायचे.

कै­ऱ्या व पाड खाऊन झाल्यानंतर ज्या आंब्यांच्या झाडांच्या फांद्या जमिनीपासून हात पुरेल किंवा उडी मारून हात पुरेल, अशा उंचीवर आहेत, त्या झाडांवर मुले सूरपारंब्यांचा वा डाबडुबलीचा खेळ खेळायचेत. त्यामुळे मुलं झाडांवर खोडावरून किंवा फांद्यांवरून चढण्यात वा खाली उडी मारण्यात पटाईत बनायचेत. अशा दमदार खेळांमुळे मुलांच्या अंगी धाडसी वृत्ती वाढायची, अंगचा कणखरपणा वाढायचा. असेच एकदा एका खेडेगावातील संकेत हा शाळकरी मुलागा आणि त्याच्या नामू, सदू, जगू, सोमू, विनू इ. मित्रमंडळीने आपला मोर्चा आंबराईकडे वळविला. नेहमीप्रमाणे मीठकै­या, पाड ह्यांच्यावर ताव मारून मंडळी डाबुडुबली खेळावयास लागली.

कुणी खोडावरून सरसर आंब्याच्या झाडावर चढायचे, कोणी फांद्यांवरून भराभर चढायचे, तर कोणी धाडधाड खाली उड्या मारायचे. इकडून तिकडे पळायचे. एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करायचे. पडायचे, उठायचे. पुन्हा तिकडून इकडे धावायचे, असा त्यांचा खेळ चांगलाच रंगात आला होता.

एका फांदीवरून संकेतने खाली उडी घेतली एवढ्यात त्याला नामूचा आवाज ऐकू आला. अरे संकेत, बघ! किती छान तजेलदार, पिवळाधम्मक, सुंदरसा पाड आहे! संकेतने वर बघितले. नामू एका बारीक डहाळीच्या शेंड्याकडे एक सुरेखसा मोहक शेंद­्या पाड तोडण्यासाठी त्याला जाताना दिसला. ती डहाळी खालून किडलेली आहे, हेही चाणाक्ष संकेतच्या शोधक नजरेने पटकन हेरले. तो खालून जोराने ओरडला, ‘नामू थांब, त्या पाडाच्या लोभात पडू नको. ती डहाळी खालून किडलेली आहे. केव्हाही मोडून पडेल.’ पण नामू कसला ऐकतो. तो म्हणाला, ‘काही नाही रे, थोडासा हात लांबवून पटकन काढतो.’ जसा नामू त्या डहाळीवर थोडा पुढे सरकला, तशी ती डहाळी कडकन आवाज करीत तुटली. नामू त्या फांदीसह धाडकन खाली येऊ लागला. तेवढ्यात ती फांदी वरच दुस­ऱ्या एका फांदीत अडकली आणि नामू खाली पडू लागला. ते बघताक्षणीच झटकन संकेत तिकडे धावला आणि पटकन त्याने आपले दोन्ही हात समोर करून चटकन नामूला झेलले. नामूच्या ओझ्यामुळे दोघेही जमिनीवर कोसळले. पण संकेत आधीच सावध असल्याने त्यांना काही फार मार लागला नाही. दोघेही ताबडतोब उठून बसले. तोपर्यंत सगळ्यांनी धडाधड खाली उड्या मारल्या व त्यांच्याजवळ गोळा झालेत. साऱ्यांनी पाडाच्या लोभात पडणा­ऱ्या लोभी नामूची चांगलीच खरडपट्टी काढली. अर्थात संकेतच्या चाणाक्षपणाची प्रशंसा झाली. नामूने साऱ्यांची क्षमा मागितली. सर्व खेळ सोडून गावाकडे परतले.

-प्रा. देवबा पाटील
Comments
Add Comment