मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात वाहन चोरीच्या ८४४ पैकी केवळ ३८३ गुन्ह्यांचा उलगडा
भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ८४४ वाहनांची चोरी झाली असून यापैकी केवळ ३८३ वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
त्याआधी २०२१ या वर्षात ८६९ गुन्हे दाखल झाले असून अवघ्या ३१९ गुन्ह्यामध्ये उकल करण्यात आले आहे. २०२१ व २०२२ या दोन्ही वर्षातील दाखल व उघड गुन्ह्यांची आकडेवारी पाहता पोलिसांना निम्म्याहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.
मिरा भाईंदर शहरात अनेक इमारतीत वाहनतळाची सोय नसल्यामुळे नाईलाजाने वाहनधारकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. मात्र रस्त्यावर वाहन उभे केल्यानंतर ते चोरीला जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या हद्दीमधील काशिमीरा, नयानगर, माणिकपूर, वालीव, पेल्हार या पोलीस ठाण्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अधिक असून दाखल गुन्ह्यांची संख्या देखील अधिक आहे.
नवघर, मिरारोड, उत्तन, भाईंदर, वसई, नालासोपारा, अर्नाळा, मांडवी, आचोळे, तुळींज या पोलीस ठाण्यात दाखल व उघड गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याकरिता पोलीस प्रशासनाने पालिका प्रशासनाच्या मदतीने चौकचौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी केली आहे. तसेच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढवून दिवस-रात्र पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. अनेक भागात कॅमेरे बसवण्यात आल्याने वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.