लखनऊ (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर टी-२० सिरीजची निराशाजनक सुरुवात करणारा भारतीय संघ उद्या रविवारी मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि पाहुण्या न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना उद्या लखनऊमध्ये रंगणार आहे. हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ असा आहे. तसेच हार्दिक पंड्यांच्या नेतृत्वकौशल्याची ही परीक्षा असल्याचे मानले जात आहे. मुख्य म्हणजे मालिकेतील दुसरा सामना म्हणजे आघाडीच्या फलंदाजांची कसोटी आहे.
एकदिवसीय मालिकेतील धडाकेबाज कामगिरीनंतर टी-२० मालिकेची सुरुवात मात्र भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे करता आली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नाराज केले. शुभमन गिल, इशन किशन आणि राहुल त्रिपाठी हे आघाडीचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. कर्णधार हार्दिक पंड्यालाही फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या दुकलीने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण अन्य फलंदाजांचे अपयश भारताला पराभवाच्या खाईत घेऊन गेले. खासकरून आघाडीच्या फलंदाजाची निराशा भारताचा खेळ खराब करून गेली. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल अशा प्रमुख अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थित युवा खेळाडूंना आपला खेळ उंचवावा लागेल. त्यामुळे पंड्यासह युवा खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी आहे. मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर आघाडीच्या फळीला धावा कराव्याच लागतील. सुरुवात चांगली झाली, तर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या हे अनुभवी खेळाडू आहेत.
दुसरीकडे एकदिवसीय मालिकेतील लाजिरवाण्या पराभवाची निराशा झटकून किवींनी टी-२० मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. त्यांच्या सलामीवीरांनी खणखणीत कामगिरी केली आहे. त्याला मिचेलच्या खेळीची जोड आहे. दुसरीकडे त्यांचे गोलंदाजही भारतापेक्षा सरस ठरत आहेत. याच जोरावर न्यूझीलंडला टी-२० मालिकेची दमदार सुरुवात करता आली आहे. मालिकेतील दुसरा सामना जिंकून ते एकदिवसीय पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कर्णधार मिचेल सँटनरने आपल्या नेतृत्वाला साजेल अशी गोलंदाजी केली आहे. त्यांच्या गोलंदाजीतही चांगलाच ताळमेळ झाला आहे. यात सातत्य राखता आले, तर त्यांना मालिकेतील दुसरा सामना आपल्या बाजूने झुकवता येऊ शकतो.