सांगली : तुमच्याकडून मी माल खात नाही, त्यामुळे पुढच्या २५ वर्षात एक जरी खड्डा पडला तर तुम्हाला बुलडोझरखाली टाकेन, अशी धमकी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधकाम ठेकेदारांना दिली आहे. सांगली येथे झालेल्या एका रस्ते उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी केलेले हे विधान कंत्राटदारांसाठी इशारा मानले जात आहे.
“मी नेहमी ठेकेदारांना सांगतो की तुमच्याकडून मी माल खात नाही. देशात कुणीही ठेकेदार असा नाही की ज्याच्याकडून मी कधी एक रुपयाही घेतलाय. त्यामुळे कामात गडबड केली तर तुम्हाला बुलडोझरखालीच टाकेन. त्यामुळेच पुढची ५० वर्षं या रस्त्याला काही होणार नाही हे मी विश्वासाने सांगतो. कारण ९६-९७ साली आपण काँक्रिटमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधला. आज २६-२७ वर्षं झाली. पण त्या रस्त्यावर खड्डा नाही. माझ्या मतदारसंघात नागपूरला ५५०-६०० किलोमीटर काँक्रीट आहे. नागपुरात तुम्ही पावसाळ्यात कधीही या, तुम्हाला कधी खड्डे दिसणार नाहीत”, असे गडकरी यावेळी म्हणाले.
२५ वर्षं एकही खड्डा पडणार नाही असा रस्ता होईल
सांगलीमध्ये नितीन गडकरींनी बोलताना २५ वर्ष एकही खड्डा पडणार नाही, असा रस्ता तयार होईल, असे आश्वासन दिले. “या रस्त्याचे भूमीपूजन न करता काम सुरू करा, अशा सूचना मी दिल्या होत्या. ही गोष्ट खरी आहे की या रस्त्याचा त्रास खूप झाला आहे. सगळ्यांनी मला याचा त्रास सांगितला आहे. जमीन अधिग्रहण वगैरेमुळे रस्ता लांबत गेला. या रस्त्यावर ८६० कोटी खर्च होणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिन्याभरात कामाला सुरुवात होईल. पुढची २५ वर्षं या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, असा हा मजबूत रस्ता होईल असा विश्वास मी देतो”, असे नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी हे त्यांच्या हजरजबाबी वृत्ती आणि किश्श्यांमुळे कायमच चर्चेत असतात. गडकरी आपल्या भाषमांमध्ये त्यांच्याबाबत घडलेले अनेक किस्से सांगताना दिसतात. विकासकामे करून घेताना गडकरींचा प्रशासनावर आणि कंत्राटदारांवर वचक असल्याचे त्यांच्या भाषणांमधून आणि कार्यपद्धतीतून सहज दिसून येतो.
यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात गडकरींनी सांगितलेला किस्साही असाच चर्चेत आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी धीरूभाई अंबानींसमवेत घडलेला एक किस्सा सांगितला. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाच्या निविदे प्रक्रियेमुळे धीरूभाई अंबानी हे नितीन गडकरी यांच्यावर नाराज झाले होते. ३६०० कोटी रुपयांची निविदा असताना गडकरी यांनी ती निविदा प्रक्रिया रद्द केली होती. यामुळे नाराज झालेल्या अंबानी यांनी “१८०० कोटी रुपयांमध्ये तुम्ही महामार्ग बनवू शकत नाही” असे म्हणत सुनावले होते. नितीन गडकरींनी देखील “मी हा रोड तेवढ्याच पैशांमध्ये बनवून दाखवणार, तसे न झाल्यास मी माझ्या मिशा कापेन” असे आव्हान धीरूभाई यांना दिले होते. मात्र, “द्रुतगती मार्ग अवघ्या दोन वर्षात तो ही अवघ्या १६०० कोटी रुपयात बनवून दाखवला. धीरूभाई अंबानी यांनी मी हरलो तुम्ही जिंकलात असे मान्य केले होते”, असे गडकरी या कार्यक्रमात म्हणाले.